कारमध्ये गॅस भरणे झाले सोपे, महानगर गॅसचे मोबाइल फिलर सेवेत दाखल

गॅसवर धावणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी महानगर गॅस कंपनीने मोबाइल फिलर सेवा सुरू केली आहे

Mahanagar Gas Limited introduces India’s first Mobile CNG Refuelling Unit
कारमध्ये गॅस भरणे झाले सोपे, महानगर गॅसचे मोबाइल फिलर सेवेत दाखल 

थोडं पण कामाचं

  • कारमध्ये गॅस भरणे झाले सोपे, महानगर गॅसचे मोबाइल फिलर सेवेत दाखल
  • पनवेल जवळ अजिवली या ठिकाणी महानगर गॅस कंपनीचा मोबाइल फिलर
  • मोबाइल फिलरद्वारे १५० कार अथवा ३५० रिक्षांच्या इंधन टाक्या (गॅस टँक) पूर्ण भरणे शक्य

मुंबईः प्रदूषणाला आळा घालणारा आणि वाजवी दरात उपलब्ध असलेला गॅस वापरुन वाहने चालवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुंबई-पुणे या राज्यातील प्रचंड वर्दळीच्या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या संख्येने गॅसवर चालणारी वाहने धावू लागली आहेत. या वाहनांना गॅस भरुन घेणे आता आणखी सोपे होणार आहे. गॅसवर धावणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी महानगर गॅस कंपनीने मोबाइल फिलर सेवा सुरू केली आहे. Mahanagar Gas Limited introduces India’s first Mobile CNG Refuelling Unit

मुंबई-पुणे मार्गावर पनवेल जवळ अजिवली या ठिकाणी महानगर गॅस कंपनीचा मोबाइल फिलर सज्ज ठेवला आहे. या फिलरचे उद्घाटन देशाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केले. गॅस स्टेशन प्रमाणेच मोबाइल फिलरच्या मदतीने वाहनात गॅस भरणे सोपे, वेगवान आणि सुरक्षित आहे. पूर्ण भरलेल्या मोबाइल फिलरद्वारे १५० कार अथवा ३५० रिक्षांच्या इंधन टाक्या (गॅस टँक) पूर्ण भरणे शक्य आहे. यामुळे गॅस स्टेशनवर न जाता वाहनात इंधन भरुन घेऊन झटपट पुढचा प्रवास करणे गॅसवर धावणाऱ्या वाहनांसाठी सोपे झाले आहे. लवकरच मोबाइल फिलरची सेवा देशातील आणखी निवडक गर्दीच्या रस्त्यांजवळ उपलब्ध करुन दिली जाईल.

पनवेल जवळ अजिवली या ठिकाणी लक्सफर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने मोबाइल फिलर सेवा सुरू करण्यात आली आहे. याच पद्धतीने देशातील निवडक ठिकाणी वेगवेगळ्या व्यावसायिक आस्थापनांच्या सहकार्याने भागीदारीत मोबाइल फिलरची सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे गॅस स्टेशनवरील रांगा कमी होण्यास मदत होईल. 

प्रदूषणाला आळा घालणाऱ्या शुद्ध इंधनाचा देशातील वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. सध्या देशाच्या एकूण ऊर्जेच्या वापरात प्रदूषणाला आळा घालणाऱ्या शुद्ध इंधनरुपी गॅसचे प्रमाण ६.२ टक्के आहे. हे प्रमाण २०३० पर्यंत १५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच गॅसच्या वापराला प्रोत्साहन देणारे नवनवे प्रयोग केले जात आहेत. महानगर गॅस कंपनीने मोबाइल फिलरच्या माध्यमातून उपलब्ध केलेली सोय गॅसवर धावणारी वाहने चालवणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. या सोयीमुळेच भविष्यात गॅसवर धावणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढू शकेल; असा विश्वास पेट्रोलियम मंत्र्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी