डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बँका ७ दिवस बंद

Maharashtra BANK HOLIDAYS IN December 2020 सुट्यांमुळे डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बँका ७ दिवस बंद राहणार आहेत.

Maharashtra BANK HOLIDAYS IN December 2020
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बँका ७ दिवस बंद 

थोडं पण कामाचं

  • डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बँका ७ दिवस बंद
  • आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस सुरू राहणार २४ तास
  • इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२०

मुंबईः सुट्यांमुळे डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बँका ७ दिवस बंद राहणार आहेत. यात चार रविवारच्या सुट्या आहेत. नियमानुसार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी आहे. या व्यतिरिक्त नाताळ असल्यामुळे २५ डिसेंबर रोजी सुटी आहे. ख्रिस्ती बांधवांना २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत नाताळच्या सुट्या मिळतील. इतर कर्मचाऱ्यांना नाताळ निमित्त फक्त २५ डिसेंबर रोजी सुटी आहे. याच कारणामुळे डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बँका सात दिवस बंद असतील. इतर दिवस कार्यालयीन वेळेत सुरू असतील. (Maharashtra BANK HOLIDAYS IN December 2020)

ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग, मोबाइल वॉलेट यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना बँका बंद असल्या तरी अडचण जाणवणार नाही. ते बँकेत न जाता आपले आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करू शकतील. तसेच एटीएम सेवेचा वापर करुन ग्राहक पैसे काढून घेऊ शकतील. सुट्यांमुळे नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसणार नाही. राज्यातील बँका २४ ते २७ डिसेंबर अशा सलग तीन दिवस बंद असल्या तरी सामान्यांना त्रास होण्याची शक्यता कमी आहे. अनेक बँकांनी सुट्यांच्या दिवसांमध्ये आपल्या एटीएममध्ये पुरेशी रोख रक्कम राहावी यासाठी 'थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर'ची मदत घेतली आहे. खासगी कंपनीमार्फत एटीएममध्ये पुरेशी रोख रक्कम राहील याची काळजी घेतली जाईल.

आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आयकर विवरणपत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच आर्थिक वर्ष २०१९-२०चे व्यवसायाशी संबंधित आयकर विवरणपत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक बँकांनी ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांसाठी डिजिटल पद्धतीने व्याज प्रमाणपत्र (interest certificate) उपलब्ध करुन दिले आहे. यामुळे रिटर्न फाइल करण्यासाठी बँकेकडून व्याज प्रमाणपत्र (interest certificate) मागणाऱ्यांची डिसेंबर महिन्यात गर्दी होण्याची शक्यता कमी कमी आहे. बँकांच्या सात सुट्यांचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विशेष फरक पडणार नाही.

आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस सुरू राहणार २४ तास

भारतात १ डिसेंबर पासून आयएमपीएस (Immediate Payment Service - IMPS), एनईएफटी (National Electronic Fund Transfer- NEFT), आरटीजीएस (Real Time Gross Settlement - RTGS) २४ तासांमध्ये कधीही करता येईल. एनईएफटीमध्ये १ रुपया ते कितीही रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर केले जाते. निवडक बँकांमध्ये एनईएफटीवर जास्तीत जास्त रकमेबाबत मर्यादा आहे. तर आरटीजीएसमध्ये किमान २ लाख रुपये ते कमाल कितीही रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर केले जाते. आपण ऑनलाइन बँकिंग करत असाल तर स्वतःच्या खात्यातून स्वतःच एनईएफटी अथवा आरटीजीएस करू शकता. ऑनलाइन बँकिंग करत नसाल अथवा ते शक्य नसेल तर बँकेच्या माध्यामातून आपण एनईएफटी अथवा आरटीजीएस करुन रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर करू शकता. जर एकाच बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम हस्तांतरित करायची असेल तर आयएमपीएस (Immediate Payment Service - IMPS) या पर्यायाचा वापर केला जातो. आपण ऑनलाइन बँकिंग करत असाल तर स्वतःच्या खात्यातून त्याच बँकेच्या दुसऱ्या खात्यात आयएमपीएसद्वारे रकमेचे हस्तांतर करू शकता. ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांना १ डिसेंबर २०२० पासून आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापरण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यामुळे भारताचा वेगाने ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या निवडक देशांमध्ये समावेश होईल.

डिसेंबर २०२० मध्ये महाराष्ट्रात बँकांना असलेल्या सुट्या

  1. ६ डिसेंबर, रविवार
  2. १२ डिसेंबर, दुसरा शनिवार
  3. १३ डिसेंबर, रविवार
  4. २० डिसेंबर, रविवार
  5. २५ डिसेंबर, शुक्रवार, नाताळ
  6. २६ डिसेंबर, चौथा शनिवार
  7. २७ डिसेंबर, रविवार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी