'या' ५ चुका टाळल्या तर तुमचे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य होईल चिंतामुक्त

काम-धंदा
Updated Apr 08, 2021 | 20:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य चिंतामुक्त आणि सुखकारक होण्यासाठी टाळावयाच्या ५ चुकांची माहिती आम्ही येथे तुम्हाला देत आहोत.

Financial planning is important for fund raising
मोठी रक्कम उभारण्यासाठी टाळा ह्या चुका 

थोडं पण कामाचं

  • सध्याच्या काळात निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन ही अत्यंत महत्त्वाची बाब
  • आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी उत्तम आर्थिक नियोजन करण्याची आवश्यकता
  • रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी बचतीचे महत्त्व मोठे

नवी दिल्ली : आपल्यातील बहुसंख्य लोक हे निवृत्तीनंतरच्या नियोजनासंदर्भात (Retirement Planning)बेफिकिर किंवा निष्काळजी असतात. सध्याच्या काळात निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली आहे. मात्र बऱ्याचवेळा सर्वसामान्य माणसं अशा चुका करतात की त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात. रिटायरमेंटनंतर आपला दैनंदिन खर्च करण्यास कोणतीही अडचण येऊ, आर्थिक स्थैर्य असेल इतकी रक्कम आपल्याजवळ असावी असे प्रत्येकालाच वाटते. मात्र हे आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी उत्तम आर्थिक नियोजन करण्याची आवश्यकता असते. शिवाय चांगली रक्कम उभी होण्यासाठी काही चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत. इथे आपण अशाच ५ चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करताना टाळायलाच हव्यात.

१. आर्थिक नियोजनाची सुरूवात उशीरा करणे
निवृत्तीनंतर चांगली रक्कम आपल्या हाती असावी असे वाटणारे बहुसंख्य लोक आर्थिक नियोजनाची सुरूवात उशीरा करतात. ही सर्वात मोठी चूक असते. उदाहरणार्थ बरेच लोक २५ - २६ वर्षांचे असताना कार विकत घेण्यास प्राधान्य देतात. निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाची तयारी सुरू करण्याऐवजी कार घेणे आणि त्यासाठी कर्ज घेणे यालाच प्राधान्य दिले जाते. रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी बचतीचे महत्त्व मोठे असते. मात्र त्या बचतीला मोठा दणका अशा खर्चामुळे लागतो. निवृत्तीनंतर हाती मोठी रक्कम असण्यासाठी नोकरी लागताच किंवा व्यवसायाची सुरूवात करताच पैशांची बचत सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठीच सुरूवातीपासून आपले उद्दिष्ट ठरवा आणि त्यानुसार बचतीची सुरूवात करा.

२. फायनान्शियल प्लॅन बनवा
निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि आर्थिक संकटे टाळण्यासाठी योग्य असा फायनान्शियल प्लॅन हवा. हा प्लॅन बनवताना निवृत्तीचे अंदाजित वय, आपला मासिक खर्च, वैद्यकीय खर्च इत्यादी बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. वर्तमानासाठी आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आर्थिक उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत. शिवाय रिटायरमेंटसाठी करण्यात येत असलेल्या गुंतवणुकीतून अधूनमधून रक्कम काढता कामा नये.

३. वैद्यकीय खर्चाकडे कानाडोळा करणे
सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या  कोरोना महामारीमुळे वैद्यकीय खर्च आणि सुविधांबद्दल आपल्याला जास्त सजग बनवले आहे. मागील काही वर्षात वैद्यकीय खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या जरी तुम्ही आजारी नसलात किंवा तुमचा कोणताही मोठा वैद्यकीय खर्च नसला तरी भविष्यातील आजारपण आणि वैद्यकीय खर्चाची तरतूद तरुण वयातच केली पाहिजे. यासाठी लवकरात लवकर आरोग्य विमा घेणे श्रेयस्कर ठरते. याशिवाय वैद्यकीय खर्चासाठी वेगळी तरतूददेखील करून ठेवली पाहिजे.

४. अनावश्यक खर्च
रिटायरमेंटनंतर हाती चांगला पैसा असण्यासाठी सर्वात मोठा अडसर म्हणजे अनावश्यक खर्च. सद्याच्या काळात खर्च करण्यासाठी किंवा विविध खरेदी करण्यासाठी आर्थिक सेवांची चंगळ आहे. त्यामुळे तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही क्रेडिटवर किंवा इएमआयच्या माध्यमातून गरज नसतानादेखील मोठी खरेदी करत असता. या वस्तू तुम्हाला तात्पुरता आनंद नक्कीच देतील. परंतु त्यामुळे तुमच्या बचतीला आणि पर्यायाने गुंतवणुकीला मोठा फटका बसतो. याचा विपरित परिणाम आर्थिक नियोजनावर होत असतो. दर महिन्याला तुम्ही नियमित बचत केली पाहिजे. 

५. पोर्टफोलियोमधील वैविध्य
तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य असणे महत्त्वाचे आहे. बऱ्याचवेळा असंख्य लोक एफडी किंवा पीपीएफ अशाच सुरक्षित गुंतवणूक प्रकारात पैसे गुंतवत असतात. मात्र म्युच्युअल फंड किंवा शेअरसारख्या इक्विटी प्रकारातही तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. याशिवाय इतर गुंतवणूक प्रकारातही विभागून गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने आपले वय, जोखीम क्षमता, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी बाबी लक्षात घेऊन चांगला पोर्टफोलिओ तयार करणे ही रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक स्थैर्याची गुरूकिल्ली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी