नवी दिल्ली: सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीच आधी एक प्रचंड मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने तब्बल ११ लाख कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. हे सलग सहावं वर्ष आहे जिथे रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनससाठी सरकार तब्बल २०२४ कोटी रुपये खर्च करणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले. त्यापैकीच एक म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांचा बोनस.
रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा कॅबिनेट मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. यावेळी जावडेकर असं म्हणाले की, 'असं पहिल्यांदाच होत आहे की, एखादं सरकार हे सलग ६ वर्ष रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देत आहे.'
ते पुढे असंही म्हणाले की, 'हा बोनस म्हणजे रेल्वे कर्माचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीबद्दल देण्यात आलेलं गिफ्ट आहे. तसंच सणासुदीच्या आधीच बोनस देण्यात आल्याने बाजारात मागणी वाढण्याची शक्यता वाढली आहे.'
रेल्वेमध्ये जवळजवळ ११ लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. हा बोनस नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. हा एक प्रकारचा प्रोडेक्टिविटी लिंक्ड बोनस आहे. मागील वर्षी प्रति कर्मचारी बोनसची सर्वाधिक रक्कम १७९५१ रुपये एवढी होती. प्रत्येक वर्षी रेल्वे कर्माचाऱ्यांना दसऱ्याच्या आधीच बोनसचं वाटप केलं जातं. रेल्वेमध्ये प्रोडेक्टिविटी लिंक्ड बोनस हे १९७९ सालापासून सुरु करण्यात आलं आहे. याआधी ७२ दिवसाच्या वेतनाच्या बरोबरीने बोनस दिला जात होता. पण यंदा तब्बल ७८ दिवसांचा बोनस देण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत रेल्वेच्या बोनसशिवाय ई-सिगरेटवर बंदी हा देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली. यापुढे भारतात ई-सिगरेटचं उत्पादन, वितरण, विक्री, संग्रहण आणि जाहिरात या सगळ्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसंच पहिल्यांदा याबाबत गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचा दंड आणि १ वर्षाची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे.