मदर्स डे ला सरकारची महिलांसाठी भेट! पाहा ही खास योजना

काम-धंदा
Updated May 09, 2021 | 21:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

या विशेष दिवशी मातांना केंद्र सरकारकडून एक खास भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने एक खास स्कीम सुरू केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY)असे आहे.

PM matritva vandana Yojana, PMMVY
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) 

थोडं पण कामाचं

  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना
  • गर्भवती महिलांना ५,००० रुपये
  • ऑनलाईनदेखील करता येतो अर्ज

नवी दिल्ली: दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे (Mother’s Day) साजरा केला जातो. या विशेष दिवशी मातांना केंद्र सरकारकडून एक खास भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने एक खास स्कीम सुरू केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY)असे आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांच्या आणि त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी, प्रगतीसाठी सरकार त्यांच्या खात्यात ५,००० रुपये जमा करणार आहे. ही रक्कम हफ्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी केंद्र (AWC)किंवा सरकारी आरोग्य केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ कसा मिळतो ते पाहूया.

तीन हफ्त्यांत मिळेल रक्कम


पीएम मातृत्व योजनेअंतर्गत पहिल्यांदा गर्भवती होणाऱ्या महिलांना सरकारकडून ५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामुळे या महिला आपल्या पोषणावर लक्ष देऊ शकतील. ही रक्कम त्यांना तीन हफ्त्यात मिळेल. पहिला हफ्ता १,००० रुपयांचा असून तो गर्भधारण केल्यानंतर १५० दिवसांनी मिळेल. यासाठी महिलेने नोंदणी करणे आवश्यक आहे. यानंतर दुसरा हफ्ता २,००० रुपयांचा असून तो १८० दिवसांनी मिळेल. तिसरा हफ्ता २,००० रुपयांचा असून तो डिलिव्हरीनंतर आणि बाळाच्या पहिल्या लस घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळेल.

अर्ज करण्याची प्रक्रिया


पीएम मातृत्व नंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईनदेखील अर्ज करता येतो. यासाठी www.Pmmvy-cas.nic.in वर लॉगिन करावे लागेल आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बॅंक किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्याचे पासबुक, पीएचसी किंवा सरकारी हॉस्पिटलमधील स्वास्थ कार्ड, सरकारी विभाग/कंपनी यांच्याकडून देण्यात आलेले कर्मचारी ओळखपत्र इत्यादींच्या फोटोकॉपीची आवश्यकता असेल. इथे फॉर्म भरून आपली नोंदणी करावी लागेल.

योजनेशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाटी महिलेचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे.
  2. या योजनेअंतर्गत अशा महिलेला अर्ज करता येणार नाही जी सरकारी नोकरी करते किंवा इतर कायद्याद्वारे लाभ घेते आहे किंवा योजनेअंतर्गत आधीसुद्धा लाभ मिळाला आहे.
  3. याशिवाय ज्या गर्भवती महिला सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरीत कार्यालयातून गरोदरपणाच्या सुटीवर असतील त्या अर्ज करू शकत नाहीत.

गर्भवती महिलांच्या आरोग्याची नीट काळजी घेतली जावी. त्यांना योग्य ते पोषण मिळावे शिवाय नवजात बालकांची व्यवस्थित काळजी घेतली जावी, यासाठी सरकारकडून योजना राबवण्यात येत असतात. यात थेट आर्थिक मदतीशिवाय इतरही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील महिलांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. विशेषत: गर्भारपणाच्या काळात त्यांच्या आरोग्याची मोठी हेळसांड होते. याचा परिणाम बाळाच्या प्रकृतीवरदेखील होत असतो. हे मुद्दे लक्षात घेऊनच महिलांना सहाय्य करण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या थेट आर्थिक मदत त्या महिलेला मिळणार आहे. ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्यामुळे अर्ज करणेदेखील सोपे झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी