एका दिवसात मुकेश अंबानींचं झालं 'एवढ्या' हजार कोटींचे नुकसान

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Mar 09, 2020 | 18:37 IST

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मोठा झटका बसला. त्याचे शेअर्स १३ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे मुकेश अंबानी यांना सुमारे ४४००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

mukesh ambani lost so many thousand crore rupees in one day reliance shares biggest decline in 12 years
एका दिवसात मुकेश अंबानींचं झालं 'एवढ्या' हजार कोटींचे नुकसान  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं आज (सोमवार) जवळपास ४४,००० कोटी रुपयांचे नुकसान झालं. त्यांची प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर हे तब्बल १३ टक्क्यांनी घसरले आहे. ही मागील १२ वर्षातील रिलायन्सच्या शेअर्समधील सर्वात मोठी घसरण आहे. फोर्ब्सच्या रिअलटाइम निव्वळ संपत्तीनुसार, मुकेश अंबानींची निविवळ संपत्ती ४१.८ अब्ज डॉलर्स एवढी होती. ज्यामध्ये सोमवारी १२.४० टक्क्यांची घट झाली. त्यामुळे अवघ्या एका दिवसात त्यांची संपत्ती ५.९ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. 

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ३० टक्क्यांहून जास्त कपात झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण दिसून आली. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीवरून सध्या सुरु असलेल्या स्पर्धेमुळे सोमवारी तेलाच्या किंमती या ३० टक्क्यांहून अधिक खाली आल्या. १९९१ नंतरची कच्चा तेलाच्या किंमतीतील ही सर्वात मोठी घसरण आहे. तेल उत्पादक देशांमध्ये उत्पादनाविषयी सहमती होऊ न शकल्याने प्रमुख तेल निर्यातदार सौदी अरेबियाने किंमत प्रचंड कपात करत असल्याची घोषणा केली. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, क्रूडच्या किंमतीत घट झाल्यामुळे RILच्या नफ्यावर थेट परिणाम होईल.

यावर्षी ३ लाख कोटी रुपयांनी घटलं RILचं बाजार मूल्य

आरआयएलचे बाजार भांडवल आज १ लाख कोटींपेक्षा कमी झाले. आजच्या घसरणीसह, आरआयएलचे बाजार भांडवल ७ लाख कोटींपेक्षा कमी झालं आहे. येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आरआयएल दहा लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह पहिली भारतीय कंपनी बनली होती. या वर्षात आरआयएलचे बाजार मूल्य आतापर्यंत ३ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

सेन्सेक्समध्ये मोठी घसरण 

जगभर पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचा मोठा परिणाम आर्थिक घडामोडीवर झाल्याने सोमवारी जागतिक शेअर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली आहे. दुसरीकडे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १९४१ अंकांनी घसरला. या घसरणीमुळे स्थानिक बाजारामधील गुंतवणूकदारांचे सुमारे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये ओएनजीसीला सर्वाधिक १६ टक्क्यांपेक्षा जास्त तोटा झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी