वॉरन बफेंना मागे टाकत मुकेश अंबानी झाले जगातले सातव्या क्रमांकाचे श्रीमंत

Mukesh Ambani World 7th Richest Person भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांमध्ये सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.

Mukesh Ambani World 7th Richest Person
मुकेश अंबानी जगातले सातव्या क्रमांकाचे श्रीमंत 

थोडं पण कामाचं

 • वॉरन बफेंना मागे टाकत मुकेश अंबानी झाले जगातले सातव्या क्रमांकाचे श्रीमंत
 • रिलायन्स झाली रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड
 • जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांची यादी

मुंबईः भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांमध्ये सातव्या स्थानावर (Mukesh Ambani World 7th Richest Person) पोहोचले आहेत. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे आणि गूगलचे लेरी पेज-सर्जी ब्रिन यांना मागे टाकत मुकेश अंबानी यांनी हे स्थान पटाकावले. 

फोर्ब्स मासिकाने शेअर बाजारातील कंपनीचे मूल्य विचारात घेऊन जगातील श्रीमंताची यादी तयार केली आहे. या यादीत जगातील अव्वल दहा श्रीमंतांमध्ये आशियातील मुकेश अंबानी यांचाच समावेश झाला आहे. या यादीत २० जून रोजी मुकेश अंबानी नवव्या स्थानावर होते, आता ते सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. 

मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे बाजारातील मूल्य १२ लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. शेअर बाजारात १२ लाख कोटींपेक्षा जास्त मूल्य असलेली रिलायन्स ही पहिली कंपनी आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती ७० अब्ज डॉलर एवढी झाली आहे. फोर्ब्स रिअल टाइम आकडेवारीसह यादी (forbes real time billionaires) अपडेट करते, त्यासाठी दर पाच मिनिटांनी शेअर बाजारातील वेगवेगळ्या कंपन्यांचे बाजार मूल्य बघितले जाते.

रिलायन्स आणि बीपी यांच्यातल्या सहकार्य करारामुळे (joint venture) मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. रिलायन्स कंपनीच्या शेअरचे दर वधारले आहेत. शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरचे मूल्य १,८८०.२० रुपये झाले आहे. 

रिलायन्स झाली रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड

रिलायन्स आणि बीपी या दोन्ही कंपन्या संयुक्तपणे (ril bp launch fuel and mobility joint venture) भारतात इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्यासाठी काम करणार आहेत. बीपीने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत १ बिलियन डॉलरचा पार्टनरशिपचा करार (joint venture) केला. या करारामुळे रिलायन्स आता रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (Reliance BP Mobility Limited - RBML) या नव्या नावाने कार्यरत होणार आहे. नव्या कंपनीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचे ५१ टक्के मालकी हक्क आहेत तर इंग्लंडच्या बीपी कंपनीचे ४९ टक्के मालकी हक्क आहेत. नवी कंपनी JIO-BP ब्रँड अंतर्गत काम करणार आहे. देशातील २१ राज्यांमध्ये ही कंपनी काम करणार आहे. सध्या भारतात रिलायन्सचे १४०० पेट्रोल पंप आहे. पार्टनरशिपमधून तयार झालेली नवी कंपनी पेट्रोल पंपांची संख्या पाच वर्षांत ५५०० करण्यासाठी काम करणार आहे. या प्रकल्पातून देशात ८० हजार नव्या रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. नवी कंपनी तेल उत्खनन, तेल शुद्धीकरण, वाहनांसाठी शुद्ध पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती, विमानांसाठी शुद्ध पेट्रोलची निर्मिती, ल्युब्रिकंट्सची निर्मिती असे अनेक प्रकल्प हाताळणार आहे. या प्रकल्पांद्वारे देशातील इंधनाद्वारे होणारे प्रदूषण कमी केले जाईल, असेही करारानंतर दोन्ही पार्टनरकडून सांगण्यात आले. कंपनी देशातील ३० ते ४५ प्रमुख विमानतळांवर मुख्य इंधन पुरवठादार होण्यासाठी नियोजन करत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठी लवकरच दर्जेदार बॅटरीची निर्मिती करणार असल्याचेही कंपनीने सांगितले.

जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांची यादी (साभार - फोर्ब्स)

 1. जेफ बेजोस - अॅमॅझॉन - १८८.२ अब्ज डॉलर
 2. बिल गेट्स - मायक्रोसॉफ्ट - ११०.९० अब्ज डॉलर
 3. बर्नार्ड अर्नोल्ट कुटुंब - LVMH - १०९.३० अब्ज डॉलर
 4. मार्क झुकरबर्ग - फेसबुक - ८९ अब्ज डॉलर
 5. स्टीव्ह बाल्मर - मायक्रोसॉफ्ट -  ७४.१० अब्ज डॉलर
 6. लॅरी एलिसन - सॉफ्टवेअर उद्योग ७२.८० - अब्ज डॉलर
 7. मुकेश अंबानी - ७०.१० - तेल आणि वायू उद्योग - अब्ज डॉलर
 8. वॉरन बफे - बर्कशायर हॅथवे - ६८.३० अब्ज डॉलर
 9. लॅरी पेज - गूगल - ६७.८० अब्ज डॉलर
 10. सर्जी ब्रिन - गूगल - ६६ अब्ज डॉलर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी