Crypto Tokens | सलमान खानपासून मॅकडोनाल्डपर्यत सर्वच जण लॉंच करत असलेले हे NFT काय आहे? तुम्ही यात गुंतवणूक करावी का?

NFT | एनएफटी हे एक खास डिजिटल टोकन असते आणि हे डिजिटल टोकन (Digital Token)हळूहळू भारतीय बाजारपेठेत मार्ग शोधत आहेत. अर्थात याची बाजारपेठ तुलनेने अद्याप छोटी आहे आणि तरुणाई अद्याप क्रिप्टोकरन्सीकडेच (Cryptocurrency) आकृष्ट होताना दिसते आहे.

What is an NFT
नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटी काय आहे  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • अलीकडच्या काळात एनएफटी प्रचंड लोकप्रिय
  • अमिताभ बच्चन, सनी लिओनी आणि इतर अनेक कलाकारांनी त्यांचे स्वत:चे एनएफटी किंवा डिजिटल टोकन लॉंच केले
  • एनएफटी हे एक खास डिजिटल टोकन आणि डिजिटल मालमत्ता असते

NFT | नवी दिल्ली: नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटी (NFT)हे एक प्रकारची डिजिटल अॅसेट असतात. अलीकडच्या काळात एनएफटी प्रचंड लोकप्रिय होत आहेत. एनएफटीच्या विक्रीत कित्येक पटींनी वाढ झाली आहे. यात भारतीय सिनेजगतातील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), विशाल मलहोत्रा, सनी लिओनी (Sunny Leone)आणि इतर अनेक कलाकारांनी त्यांचे स्वत:चे एनएफटी किंवा डिजिटल टोकन (Crypto Tokens) लॉंच केले आहे. हे डिजिटल टोकन (Digital Token)हळूहळू भारतीय बाजारपेठेत मार्ग शोधत आहेत. गुंतवणुकदारांमध्येदेखील डिजिटल टोकन लोकप्रिय होताना दिसत आहेत. एनएफटी हे एक खास डिजिटल टोकन असते आणि ते वितरणाच्या खातेबुकशी निगडीत असते. अर्थात याची बाजारपेठ तुलनेने अद्याप छोटी आहे आणि तरुणाई अद्याप क्रिप्टोकरन्सीकडेच (Cryptocurrency) आकृष्ट होताना दिसते आहे. अर्थात एनएफटी हे सध्या संग्रहणीय वस्तूंना डिजिटल पर्याय म्हणून प्रसिद्ध केले जात आहेत. एनएफटी नेमके काय आहे? तुम्ही यात गुंतवणूक (Investment)करावी की नाही? ते पाहूया.        (NFT : Salman Khan to other celebrities are launching their NFTs, Should you Invest in NFT?)

एनएफटी (NFT) काय असते?

साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटी ही एक डिजिटल मालमत्ता असते. एखाद्या खऱ्या वस्तूचे प्रतिनिधित्व करणारी ही डिजिटल मालमत्ता असते. ही खरी वस्तू संगीत, कला, खेळणी, गेम, व्हिडिओ किंवा सोशल मीडिया पोस्ट इत्यादी विविध वस्तूंचे डिजिटल स्वरुपात प्रतिनिधित्व करणारी ही मालमत्ता किंवा टोकन असते. मात्र याच्या नावात असल्याप्रमाणे म्हणजे हे नॉन फंजिबल टोकन असल्यामुळे याची इतर वस्तूशी अदलाबदल होऊ शकत नाही. हे युनिक आणि दुसऱ्या कशानेही न बदलता येणारे असते. अलीकडच्या काळात एनएफटी हे कलेशी निगडीत वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी लोकप्रिय झाले आहेत. मात्र यांचा शोध काही आताच लागलेला नाही. २०१४ पासून एनएफटी चलनात आहेत.

कशामुळे एनएफटी खास ठरतात?

एनएफटी हे डिजिटल टोकन असते म्हणजेच ही एक डिजिटल मालमत्ता असते. त्यामुळे याचा संबंध इंटरनेटशी आहे. प्रत्येक एनएफटीचे स्वत:चे असे एक खास वैशिष्ट्य असते. इथेच या डिजिटल टोकनचा नॉन फंजिबल भाग महत्त्वाचा ठरतो. सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे तर वॅन गॉघची एक पेंटिंग जगप्रसिद्ध आहे. त्या पेटिंगचे नाव आहे द स्टेअरी नाईट. या पेटिंगच्या जगभर लाखो प्रति उपलब्ध आहेत. परंतु त्याची अस्सल किंवा मूळ प्रत किंवा मूळ पेटिंग ही मॉस्कोमधील पुश्किन संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे तिचे स्वत:चे असे एक मूल्य आहे. त्याचप्रमाणे एनएफटी हे एक डिजिटल टोकन असल्यामुळे इंटरनेटवर प्रत्येक एनएफटीच्या असंख्य प्रती उपलब्ध असू शकतात मात्र मूळ एनएफटीचे स्वत:चे एक मूल्य कायम राहते.

हे एनएफटी नेमके वापरतात कसे ?

पारंपारिक पद्धतीने कलेशी निगडीत वस्तू किंवा तत्सम वस्तू यांचे एक मूल्य असते कारण त्या खास असतात. परंतु डिजिटल कलाविश्वात त्या कलावस्तूच्या लाखो कॉपी असू शकतात. शिवाय त्यावर कोणतेही बंधनदेखील नसते. इथेच एनएफटीची सुरूवात झाली आणि त्या वस्तूची मालकी निर्माण करण्यासाठी त्याचे टोकन तयार करण्यात आले. ते टोकन योग्य किंमतीला खरेदी करता येते आणि विकतादेखील येते. एनएफटीदेखील ब्लॉकचेनवरच अवलंबून असतात. त्यामुळे त्याचा ट्रॅक ठेवला जातो. एनएफटी ह्या डिजिटल कामांमधून निर्माण झाल्या आहेत. एनएफटी किंवा डिजिटल टोकन हे कला, व्हिडिओ, संगीत, संग्रहात ठेवण्यासारख्या वस्तू, सोशल मीडियावरील पोस्ट आणि अगदी ट्विटसाठी देखील वापरात आहेत. ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्से यांच्या पहिल्या वहिल्या ट्विटचे रुपांतर एनएफटीमध्ये करण्यात आले होते आणि ते विकण्यात आले होते. हे ट्विट तब्बल २९ लाख डॉलरला विकले गेले होते.

या दिवाळीत तुम्ही एनएफटी विकत घ्यावेत का?

एनएफटीची सध्या खूप जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अनेकजण या डिजिटल मालमत्तेविषयी किंवा डिजिटल टोकनविषयी साशंक आहेत. हा एक बुडबुडा असून तो कधीही फुटेल असे अनेकांना वाटते आहे. अर्थात तुम्ही यात गुंतवणूक करावी की नाही हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. फोर्ब्सनुसार वॉशिंग्टन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्षांचे म्हणणे आहे की एनएफटीमध्ये खूप जोखीम आहे आणि त्यांचे भवितव्य अद्याप स्पष्ट नाही. याचा फारसा इतिहास नाही, ही नवीनच संकल्पना आहे. त्यामुळे त्याची कामगिरी किंवा त्याविषयी नक्की मत व्यक्त करणे शक्य नाही. एनएफटी नवीनच असल्यामुळे यासंदर्भात प्रयोग करण्यासाठी यात अगदी छोट्या रकमेचीच गुंतवणूक केली पाहिजे. एनएफटीमध्ये अगदी १० रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यतची गुंतवणूक करता येते किंवा विकत घेता येतात. त्यामुळे एनएफटी विकत घ्यावेत की नाहीत हा वैयक्तिक निर्णय असून ही एक जोखमीची बाब आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी