मुंबई: देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक नियमांत बदल होणार आहे. या बदलांचा तुमच्या दैनंदिन आयुष्यातील व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात कुठल्या नियमांत आणि काय बदल होणार आहे. तसेच त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो.
देशातील मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (एसबीआय)च्या कोट्यवधी ग्राहकांना फटका बसणार आहे. कारण एसबीआयने आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयचा हा निर्णय एक नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. एसबीआयने एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दरात ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ३.२५ टक्के दराने व्याज मिळेल. तर एक लाखांहून अधिक रकमेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दराला रेपो रेट सोबत जोडलं आहे. या रकमेवर तीन टक्के दराने व्याज मिळेल.
व्यवहार करताना आता व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट करणं अनिवार्य आहे. यासोबतच ग्राहक किंवा मर्चेंटकडून डिजिटल पेमेंटसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क किंवा मर्चेंट डिस्काऊंट रेट (MDR) वसूल केलं जाणार नाही. मोदी सरकारकडून डिजिटल पेमेंट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. आता नव्या नियमानुसार ५० कोटींहून अधिक टर्नओव्हर असलेल्या व्यापाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे.
महाराष्ट्रात सरकारी बँकांच्या वेळापत्रकात बदल होत आहे. हा बदल एक नोव्हेंबरपासून लागू होत आहे. राज्यातील जवळपास सर्वच सरकारी बँका एकाचवेळी उघडतील आणि बंद होणार आहेत. हे नवं वेळापत्रक बँकर्स कमेटीने ठरवलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आता बँका सकाळी ९ वाजता उघडतील आणि सायंकाळी ४ वाजेपर्यंत कामकाज सुरु राहणार आहे.