मुंबई : एलआयसीच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी एलआयसी या देशातील मोठ्या विमा कंपनीने आणली आहे. दोन वर्षांपासून पॉलिसी बंद असणाऱ्या ग्राहकांना ती पुन्हा सुरू करण्याची संधी या नव्या ऑफरमध्ये देण्यात आली आहे. तसेच ज्या ग्राहकांच्या पॉलिसी रिन्यूव्ह करणे बाकी आहे, त्या पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहेत. एलआयसीच्या नव्या नियमांनुसार ज्या पॉलीसी धारकाला काही कारणास्तव आपल्या पॉलिसीचे हप्ते भरता आले नाहीत, अशांना दोन वर्षाच्या अधिक कालावधीत हप्ता न भरलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहेत. यामुळे ग्राहक आणि विमा कंपनीचाही फायदा होणार आहे. विमा कंपनीने विकलेल्या एकूण पॉलिसीचे हप्ता भरणा सुरू झाल्यास कंपनीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तर विमाधारकाला पुन्हा विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे.
यापूर्वी दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत हप्ता थकला तर त्या पॉलिसीचे नूतनीकरण करणे शक्य नव्हते. ही पॉलीस लॅप्स व्हायची. सुधारीत नियमांनुसार आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी हप्ता थकूनही योजनेचे नूतनीकरण शक्य होणार आहे, असल्याचे भारतीय आयुर्विमा महामंडळाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार कोणताही पॉलिसीधारक सलग दोन वर्ष पोलिसीचा हप्ता भरत नसल्यास त्याची पॉलिसी बंद करण्यात येत होती. एकदा पॉलिसी बंद झाल्यास ती पुन्हा सुरू करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. आता नव्या नियमांमुळे हा पर्याय उपलब्ध झाल्याने देशभरातील अनेक ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
महामंडळाने विमा नियामक मंडळाकडे या संदर्भात एक विनंती अर्ज केला होता. त्याला विमा नियामक मंडळाने याला परवानगी दिली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१४ नंतर विकलेल्या कंपनीचा विमा हप्ता थकीत झाल्याने बंद पडलेल्या युनिट लिंक्ड योजना ३ वर्षांच्या आत आणि हप्ता थकीत झाल्यामुळे निलंबित झालेल्या नॉन लिंक्ड योजना ५ वर्षांच्या आता पुन्हा नव्याने सुरू करणे शक्य आहे. १ जानेवारी २०१४ नंतर महामंडळाने विक्री केलेल्या आणि दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी हप्ता थकल्यामुळे निलंबित असलेल्या पॉलिसी आता नव्याने सुरू करणे शक्य झाले आहे.
या संदर्भात एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन आनंद यांनी सांगितले की, काही करणामुळे आर्थिक अडचण येते त्यामुळे एखाद्या व्यक्तीला विमा भरणे शक्य होत नाही. तेव्हा त्याची पॉलिसी लॅप्स होते. तसेच त्याचे विमा संरक्षण बंद होते. पुनहा विमा संरक्षण मिळविण्यासाठी नवीन पॉलिसी घेण्याऐवजी जुनीच पॉलिसी सुरू करणे, कंपनी आणि ग्राहकासाठी फायदाचे असते. आता नव्या योजनेनुसार ही सुविधा उपलब्ध झाल्याने बहुतांशी ग्राहकांना फायदा होणार आहे.