One Nation One Gold Price: एक देश, सोन्याचा एकच भाव लवकरच वास्तवात, जाणून घ्या कसे

भारतात सर्वाधिक सोन्याची आयात केली जाते. आयात केल्या जाणाऱ्या सोन्याची किंमत ही देशभरात एकसारखीच असते. मात्र, देशभरातील दागिन्यांच्या असोसिएशनकडून त्याची किंमत वेगवेगळी निश्चित करण्यात येते.

Gold
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात सोन्याचा भाव (Gold Rate) एकच असावा अशी मागणी आता जोर धरत आहे. सोन्याचे दागिन्यांची विक्री (Gold Jewelry sale) करणाऱ्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने देशभरातील सर्व स्टोअर्समध्ये सोन्याची एकसमान किंमत सुरू केली आहे. तर इतरही गोल्ड ज्वेलरी कंपन्यांकडून याच मार्गाचा अवलंब करण्याचे नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे.

भारतात सर्वाधिक सोन्याची आयात केली जाते. आयात करण्यात येणाऱ्या या सोन्याची देशभरातील किंमत ही जवळपास एकसारखी असते. पण असे असले तरी देशभरातील वेगवेगळ्या ज्वेलर्स असोसिएशनकडून ज्वेलरी, दागिन्यांचे भाव हे वेगवेगळे निश्चित केले आहेत.

उदाहरणार्थ, गुरुवारी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची किंमत १० ग्रॅमसाठी ४९,१०० रुपये इतकी होती. केरळमध्ये ही किंमत ४६,८५० रुपये, मुंबईत ४९,६८० रुपये आणि चेन्नईत ४७,३८० रुपये इतकी होती. दागिन्यांच्या क्षेत्रातील सूत्रांच्या मते, अनेक ज्वेलर्स हे टॅक्स भरत नाहीत आणि त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विक्री करतात.

मलाबार गोल्ड डायमंड्सचे अध्यक्ष अहमद एमपी यांनी म्हटलं, "वन इंडिया, वन गोल्ड रेट ही पॉलिसी लागू करण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत." त्यांनी पुढे म्हटलं, सोन्याची समान किंमत देशभरात झाली तर त्याचा फायदा ग्राहकांनाही होईल. "जीएसटी लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात दागिन्यांवरील कर एकसारखा आहे. भारतात केवळ एकच चलन आहे त्यामुळे इतर देशांप्रमाणे येथे कोणतीही अडचण येणार नाही." असंही त्यांनी सांगितलं.

अहमद एमपी यांनी पुढे सांगितलं, "आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची फक्त एकच किंमत आहे. त्यामुळे भारतातही असे करण्यास अडचण नाही. भारतातील उत्तरेकडील राज्यांत आणि दक्षिणेकडील राज्यांत सोन्याच्या भावात खूप मोठा फरक आहे. दक्षिण भारतात बऱ्याच वर्षांपासून सोन्याचे दर वाजवी राहिले आहेत आणि बायबॅक सिस्टमही आहे. तसेच हे ज्वेलर्स जास्त मार्जिनही घेत नाहीत."

अहमद एमपी यांनी म्हटलं, उत्तर भारतातील ज्वेलर्स हे जास्त मार्जिन घेतात आणि त्यामुळे दागिन्यांच्या किमती खूप वाढतात. ज्वेलर्सने बायबॅक रेट दाखवावा कारण रिसायकल केल्याने सोन्याच्या शुद्धतेवर परिणाम होत नाही. बायबॅकवर आपण दोन टक्के किंवा त्यापेक्षा कमी मार्जिन घेऊ शकतात. ज्वेलर्सने ही माहिती आपापसात शेअर करायला हवी. असे झाल्यास ग्राहकांची सोन्यात गुंतवणूक आणि खरेदीत वाढ होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी