Pakistani Rupee Fall : इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती (Pakistan Economy) दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे. पाकिस्तानी रुपयाची (Pakistani Rupee)स्थितीदेखील वाईट आहे. एकप्रकारे पाकिस्तानी रुपया हा आयसीयूमध्येच पोचला आहे. सध्या सुरू असलेली राजकीय अनिश्चितता आणि आर्थिक निर्णयांना होणारा विलंब यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरूच आहे. डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानच्या चलनाच्या घसरणीला सध्या कोणताही दिलासा नाही. विशेषत: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (IMF) संथ गतीने सुरू असलेल्या चर्चेमुळे पाकिस्तानी रुपया सावरण्याची कोणतीही आशा दिसत नाही. (Pakistani Rupee at historic fall against American dollar)
जिओ न्यूजनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानी चलनाने डॉलरच्या तुलनेत 183 रुपयांची पातळी ओलांडली आहे. ही घसरण 25 रुपयांपेक्षा जास्त आहे. गुरुवारी आंतर-बँक बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 183.48 रुपयांवर बंद झाला होता. मार्च महिन्यात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 3.38 टक्के किंवा 6.07 रुपयांनी घसरला आहे.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, विरोधकांची संख्या दिवसेंदिवस अधिक मजबूत होते आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्यास संसद बरखास्त करण्याची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांना इम्रान खान यांच्या वतीने एका महत्त्वाच्या व्यक्तीने संदेश दिला आहे.
अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी संसदेच्या महत्त्वपूर्ण अधिवेशनापूर्वी गुरुवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत हे उघड झाले. गंभीर राजकीय संकट असताना पंतप्रधानांनी स्वत:साठी सुरक्षित मार्ग निवडला असल्याची माहिती देण्यात आली. जिओ न्यूजने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले की, विरोधकांनी जर आपली सूचना स्वीकारली नाही तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास आपण तयार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : Cheap Petrol-Diesel : स्वस्त पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅससाठी भारत रशियासोबत करणार 'हा' करार?
पाकिस्तानच्या लोकसभेत एकूण ३४२ जागा आहेत. नवीन पाकिस्तान बनवण्याचा दावा करून सत्ता मिळवलेल्या इम्रान खान यांना सरकार स्थापन करण्यासाठी बाहेरून अन्य काही खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. येथे बहुमताचा आकडा १७२ जागांचा आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्यांना आता एवढ्याच खासदारांची सरकार वाचवण्यासाठी गरज आहे.
दरम्यान, सध्या नॅशनल असेंब्लीच्या जागांच्या सध्याच्या स्थितीनुसार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाकडे १५५ जागा, एमक्यूएम यांच्याकडे ७, पीएमएल-क्यू आणि बीएपी यांच्याकडे प्रत्येकी ५-५ अशा जागा आहेत. तर जीडीपीकडे ३, एएमएलकडे १ जागा आहे. याशिवाय जेडब्ल्यूपी या पक्षाकडे १ जागा आणि अपक्ष २ जागा आहेत. या सर्वांचा पाठिंबा मिळाल्यानंतर सरकारच्या पारड्यात १७६ जागा पाडायच्या आहेत. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांच्या स्थितीबद्दल भाष्य करायचे झाले तर, पीएमएल-एन या पक्षाकडे एकूण ८४, पीपीपीकडे ५६, एमएमएकडे १५, बीएनपी-एमकडे ४, एएनपी १ आणि २ जागा अपक्षांकडे आहेत. त्यामुळे विरोधकांच्या बाजूने सध्या १६२ खासदार आहे. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे अनेक खासदार बंडखोरीचा मार्ग स्विकारत आहेत.