सलग २१व्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले

PETROL DIESEL PRICE TODAY 27 JUNE 2020 सलग ८२ दिवस इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. या नंतर सात जूनपासून सलग एकविसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ

PETROL DIESEL
पेट्रोल, डिझेल 

थोडं पण कामाचं

  • सलग २१व्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले
  • पेट्रोल २३ आणि डिझेल २० पैशांनी महागले
  • मुंबईत पेट्रोल ८७.१४ रुपये आणि डिझेल ७८.७१ रुपये

मुंबई: सलग ८२ दिवस इंधनाच्या दरात वाढ झाली नाही. या नंतर सात जूनपासून सलग एकविसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवर पेट्रोल आणि डिझेलवर कर लागू आहेत. प्रत्येक राज्यात इंधनावर व्हॅट लागू होतो. या करांमुळे इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

पेट्रोल २३ आणि डिझेल २० पैशांनी महागले

मुंबईत (mumbai) (शनिवारी) पेट्रोल (petrol price) प्रति लिटर ८७ रुपये १४ पैसे तर डिझेल (diesel price) प्रति लिटर ७८ रुपये ७१ पैसे या दराने उपलब्ध आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल ८६ रुपये ९१ पैसे आणि डिझेल ७८ रुपये ५१ पैसे या दराने उपलब्ध होते. पेट्रोलच्या दरात २३ पैशांची आणि डिझेलच्या दरात २० पैशांची वाढ झाली.

लॉकडाऊनमुळे सरकारी महसुलात घट झाली आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी सर्व राज्यांनी दारू आणि इंधनावरील करांच्या माध्यमातून महसुली घट कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या करामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. 

करांमुळे वाढतो इंधनाचा दर

पेट्रोल आणि डिझेलच्या कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांवर केंद्र सरकारचा अबकारी कर तसेच राज्यांचा कर आणि सेस लागू होतो. यामुळे इंधनाचा विक्रीचा दर कंपन्यांनी जाहीर केलेल्या मूळ दरापेक्षा ५० ते ७० टक्क्यांनी वाढतो. मात्र महसुली तूट भरुन काढण्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा कर कमी करण्यास इच्छुक नाही. सार्वजनिक खर्चाच्या नियोजनासाठी कर लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात पेट्रोलवर २६ टक्के व्हॅट

महाराष्ट्रात पेट्रोलवर २६ टक्के आणि डिझेलवर २४ टक्के व्हॅट (Value added tax) म्हणजेच मूल्यवर्धित कर लागू होतो. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यात पेट्रोलवर ८.१२ रुपयांऐवजी १०.१२ रुपये आणि डिझेलवर १ रुपयाऐवजी ३ रुपये प्रति लिटर एवढा उपकर १ जून २०२० पासून लागू झाला आहे. कोरोना संकटामुळे राज्याची तिजोरी अडचणीत सापडली आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारने इंधनावरील उपकर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे प्रमुख शहरांतील दर

शहर पेट्रोल दर (प्रति लिटर रुपयांत) डिझेल दर (प्रति लिटर रुपयांत)
मुंबई ८७.१४ ७८.७१
दिल्ली ८०.३८ ८०.४०
कोलकाता ८२.०५ ७५.५२
चेन्नई ८३.५९ ७७.६१

इंधन दरवाढीवरुन राजकारण सुरू

महाराष्ट्रात इंधन दरवाढीच्या मुद्यावरुन राजकारण सुरू झाले आहे. ऐन कोरोना संकटात इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार सामान्यांवर महागाईचा बोजा टाकत असल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते करत आहेत. तर इंधनाची दरवाढ फक्त केंद्राच्या नाही तर राज्याच्या करांमुळेही होत आहे, असे भाजपकडून सांगितले जात आहे. महागाईचा जनतेला त्रास होऊ नये असे वाटत असल्यास राज्याला त्यांचे कर कमी करण्याचे स्वातंत्र्य असल्याचा मुद्दा भाजपकडून पुढे केला जात आहे. राज्याने इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपाय केलेले नाही, असाही आरोप विरोधकांकडून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या राज्यातील सरकारवर सुरू आहे. या आरोप प्रत्यारोपांच्या खेळात इंधन दरवाढीचा भार थेट सामान्यांच्या खिशावर पडत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी