Petrol-Diesel Price 31 March : नवी दिल्ली : सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तेल कंपनी IOCL च्या ताज्या दरांनुसार, दिल्लीत पेट्रोलचे नवीन दर 101.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 93.07 रुपये प्रति लीटर अशी असेल. त्याबरोबर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 84 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 116.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर प्रमाणे मिळणार आहे. मुंबईत गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 9व्यांदा वाढ झाली आहे.
यासोबतच देशातील इतर मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईमध्ये आज एक लिटर पेट्रोलवर 76 पैशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या दरवाढीनंतर येथे पेट्रोल 107.45 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. तर , डिझेलचा दर 97.52 रुपये प्रतिलिटर झाला आहे. कोलकातामध्येही पेट्रोलच्या दरात 83 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली असून, त्यानंतर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 96.22 रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असूनही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती फेब्रुवारीमध्ये प्रति बॅरल $ 130 च्या सर्वोच्च पातळीवरून $ 103 पर्यंत घसरल्या, परंतु राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या नाहीत.