Petrol Diesel rate: ....तर पेट्रोल प्रति लिटर ७५ रुपये होईल, डिझेलही होईल खूपच स्वस्त

Petrol Diesel rate: गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग वाढ होताना दिसत आहे. शंभरी गाठलेला पेट्रोलचा दर खूपच स्वस्त होण्याचा मार्ग आता सांगण्यात आला आहे. पाहूयात काय आहे हा उपाय.

Petrol Diesel price
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात (Diesel rate) गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. शंभरी गाठलेल्या पेट्रोलचा भाव कमी होऊ शकतो आणि त्यावर उपायही सांगण्यात आला आहे. पेट्रोल जर जीएसटीच्या (GST) कक्षेत आणले तर त्याची किरकोळ किंमत ७५ रुपये प्रति लिटर इतकी होऊ शकते अशी माहिती एसबीआय इकोनॉमिस्टने एका विश्लेषणात्मक अहवालात म्हटलं आहे. तसेच जीएसटी अंतर्गत डिझेल आणल्यास त्याचाही दर ६८ रुपये प्रति लिटर पर्यंत होईल असे अहवालात म्हटलं आहे.

असे झाल्यास केंद्र आणि राज्य सरकारांना जीडीपीच्या ०.४ टक्के म्हणजेच केवळ एक लाख कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागेल. ही आकडेवारी एसबीआय अर्थशास्त्रज्ञांनी मांडली आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव ६० डॉलर प्रति बॅरल आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य ७३ रुपये इतके आहे.

सध्याच्या स्थितीत प्रत्येक राज्य पेट्रोल, डिझेलवर आपल्या आवश्यकतेनुसार मूल्यवर्धित कर (व्हॅट) लावत आहे. तर केंद्र सरकार यावर उत्पादन शुल्क आणि इतर कर आकारत आहे. या सर्वांमुळे भारतात पेट्रोलच्या भावाने शंभरी गाठली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

... तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल

एसबीआय इकोनॉमिस्टने सांगितले की, जीएसटी यंत्रणेची अंमलबजावणी करताना पेट्रोल, डिझेल सुद्धा याच्या अखत्यारित आणण्याचं म्हटलं होतं मात्र, अद्याप असे झालेलं नाहीये. जीएसटीच्या अखत्यारित पेट्रोल-डिझेल आणले तर त्याचा मोठा दिलासा सर्वसामान्यांना मिळू शकेल.

...म्हणून पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही

एसबीआय इकोनॉमिस्टने म्हटले, केंद्र आणि राज्य सरकार कच्च्या तेलाची उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणण्यास तयार नाहीयेत. कारण, पेट्रोलियम पदार्थांवर विक्री कर, व्हॅट लावल्यास त्यांच्यासाठी महसूल उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत तयार होतो. या सर्वांमुळे पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणता येत नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी