LPG cylinder price | नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी! एलपीजी गॅस सिलिंडर १०२ रुपयांनी स्वस्त

Petroleum Companies : पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर (Commercial LPG gas Cylinder Price) १०२.५० रुपयांनी कमी केले आहेत. नवे दर १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ही कपात झाली आहे. दिल्लीमध्ये १ जानेवारीपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,९९८.५० रुपये झाली आहे.

Commercial LPG gas Cylinder Price
१९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर 
थोडं पण कामाचं
  • १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात
  • घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जैसे थे
  • दर महिन्याला सिलिंडरची किंमत जाहीर करतात पेट्रोलियम कंपन्या

LPG cylinder rate | नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर (Commercial LPG gas Cylinder Price) १०२.५० रुपयांनी कमी केले आहेत. नवे दर १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत. १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ही कपात झाली आहे. दिल्लीमध्ये १ जानेवारीपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,९९८.५० रुपये झाली आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना ही आनंदाची बातमी मिळाली आहे. (Petroleum companies cuts price of Commercial LPG cylinder by Rs 102)

ग्राहकांना नव्या वर्षात दिलासा

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याला एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जाहीर करत असतात. पेट्रोलियम कंपन्यांच्या या निर्णयामुळे ग्राहकांना, विक्रेत्यांना, रेस्टॉरंट आणि चहा स्टॉल चालवणाऱ्या मोठाच दिलासा मिळणार आहे. या सर्वांकडून १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. विशेष म्हणजे मागील महिन्यातच, १ डिसेंबरला १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे मागील महिन्यात दिल्लीत १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर २,१०१ रुपयांवर पोचले होते. २०१२-१३ नंतरची व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची ही दुसरी उच्चांकी किंमत होती. २०१२-१३ या वर्षात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर २,२०० रुपयांवर पोचले होते. 

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात नाही

दरम्यान घरगुती वापराच्या १४.२ किलो, ५ किलो, १० किलो कॉम्पोझिट, ५ किलो कॉम्पॉझिट एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. नोव्हेंबर २०२१मध्ये १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २६६ रुपयांची जबरदस्त वाढ झाली होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर २,०००.५० रुपयांवर पोचले होते. तर १ ऑक्टोबर २०२१ला १९ किलो गॅस सिलिंडरच्या दरात ४३ रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर ६ ऑक्टोबरला २.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याआधी १ सप्टेंबरला यात ७५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

यामुळे वाढते सिलिंडरची किंमत

भारतात एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करणाऱ्यामागे किंवा सिलिंडरची किंमत ठरण्यामागे दोन मुख्य कारणे किंवा घटक असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत असलेले रुपयाचे मूल्य. कारण कच्च्या तेलाची किंमत डॉलरमध्ये असते आणि कच्चे तेल विकत घेताना त्याचे मूल्य डॉलरमध्येच चुकवावे लागते. 

सध्याच्या नियमानुसार, सर्वसाधारण नागरिकाला १४.२ किलोच्या घरगुती वापराच्या १२ एलपीजी गॅस सिलिंडरवर सब्सिडी (LPG Gas cylinder Subsidy) मिळते. मात्र यापेक्षा अधिक सिलिंडर घेतल्यास बाजारमूल्यानुसार एलपीजी गॅस सिलिंडर विकत घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होते आहे. कच्च्या तेलाची किंमत आणि सरकारकडून उत्पादन शुल्कातील वाढ यामुळे पेट्रोल आणि डिझेल या इंधनाचे दर मागील वर्षभरात चांगलेच कडाडले आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी