पीएफ मधून ५ वर्षांआधी पैसे काढल्यास लागतात इन्कम टॅक्सचे नियम, लागेल टीडीएस

काम-धंदा
Updated May 03, 2021 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

EPF Tax rules- ५ वर्षे सतत नोकरी करण्यापूर्वीच जर ईपीएफ खात्यातून रक्कम काढण्यात आली तर सध्याच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकर भरावा लागेल.

Tax Rules for EPF withdrawal
पीएफ मधून पैसे काढण्यासाठीचे कर नियम 

थोडं पण कामाचं

  • पीएफमधील पैसे काढण्यासाठीचे नियम
  • नोकरी गेल्यास, लग्नासाठी, होमलाोन साठी काढता येतात पैसे
  • ५ वर्षांआधी पैसे काढल्यास इन्कम टॅक्स

नवी दिल्ली : कोविड-१९च्या संकट काळात पैशांची गरज सर्वांनाच आहे. यासाठी तुम्ही तुमच्या ईपीएफ खात्याचा वापर करू शकता. ईपीएफ किंवा पीएफमधून (EPF Withdrawal) अशा वेळी पैसे काढून तुम्ही आपली गरज भागवू शकता. ईपीएफ मधून पैसे काढणे आता सुलभ झाले आहे. मात्र जर तुम्ही पीएफमधून ५ वर्षांआधीच पैसे काढत असाल तर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल. ईपीएफओचा हा नियम आहे. याशिवाय वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे काढण्यात आल्यावर वेगवेगळे नियम आहेत.

ईपीएफ खात्यातून पैसे काढल्यावर टॅक्स


ईपीएफ खाते सेव्हिंग्स खात्यासारखेच आहे. यामध्ये तुम्ही पैसे जमा करता आणि वेळ आल्यावर ते काढू शकता. मात्र ईपीएफमधून पैसे काढताना काही अटी असतात. जर सतत ५ वर्षे नोकरी करण्याआधी तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढले तर प्राप्तिकर भरावा लागेल. तुमच्या सध्याच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल. 

पीएफचे कर नियम काय आहेत


कर्मचाऱ्याला जर नोकरी करण्यास ५ वर्षे पूर्ण झाली आणि त्याने पीएफ खात्यातून पैसे काढले तर कोणताही प्राप्तिकर लागत नाही. ५ वर्षांचा कालावधी एक किंवा अधिक कंपन्यांचा मिळूनदेखील असू शकतो. मात्र ५ वर्षांआधी पैसे काढल्यास १० टक्क्यांप्रमाणे टीडीएस आणि कर भरावा लागतो. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास आणि ५ वर्षांआधीच रक्कम काढल्यास फॉर्म १५ जी किंवा १५ एच भरून टीडीएस वाचवला जाऊ शकतो. पॅन कार्ड नसल्यास ३० टक्के टीडीएस द्यावा लागतो.

नोकरी गेल्यास १ महिन्याने काढता येते ७५ टक्के रक्कम


एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेल्यास तो १ महिन्यानंतर पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकतो. ईपीएफओनुसार तो कर्मचारी बेरोजगारीच्या काळात पीएफच्या पैशांनी आपल्या गरजा भागवू शकतो. पीएफ खात्यातील उर्वरित म्हणजे २५ टक्के रक्कम दोन महिन्यांनी काढता येते.

पीएफमधून पैसे केव्हा काढता येतात


कुटुंबाच्या ईलाजाच्या खर्चासाठी पीएफमधून सर्व रक्कम काढता येते. शैक्षणिक खर्चासाठी आपल्या एम्प्लॉयर कडून फॉर्म-३१ अंतर्गत अर्ज करता येतो. याशिवाय होम लोन भरण्यासाठी खात्यातील रकमेच्या ९० टक्के रक्कम काढता येते. लग्नासाठी ५० टक्के रक्कम काढता येते. फक्त रिटायरमेंटच्या वेळेस पूर्ण रक्कम काढता येते.

ईपीएफ हा कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठीचा चांगला पर्याय आहे. रिटायरमेंटच्या वेळेस त्यामुळे कर्मचाऱ्याला प्रॉव्हिडंट फंडाच्या निमित्ताने चांगली रक्कम हाती येते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील आर्थिक गरजा, दैनंदिन खर्चाची तरतूद त्यातून करता येते. रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक गरजांसाठीचे नियोजन तरुण वयातच केले पाहिजे. त्यासाठी तरुणवयातच बचत करून योग्य ती गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभी करता येते. यातून भविष्यातील आर्थिक गरजांची चिंता राहत नाही आणि रिटायरमेंटनंतर तणावमुक्त आयुष्य जगता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी