'फोन पे'चे ग्राहक सावधान : फक्त एक क्लिक आणि तुमचे अकाउंट होईल रिकामे

काम-धंदा
Updated Apr 07, 2021 | 15:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

फोन पे (PhonePe)कॅशबॅक स्कॅम : तुम्हाला कॅशबॅग मिळाले आहे, असे कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला सांगते. त्यानंतर हे कॅशबॅक मिळवण्यासाठी रिवार्डपे बटनावर क्लिक करण्यास सांगितले जाते.

Cyber fraud, alert for PhonePe users
फोन पे ग्राहकांसाठी सायबर गुन्ह्याचे अलर्ट 

थोडं पण कामाचं

  • फोन पे (PhonePe)कॅशबॅक स्कॅम
  • फक्त एक कॉल येईल आणि तुमचे बॅंक अकाउंट पूर्ण रिकामे
  • महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांचे यासंदर्भातील अलर्ट

नवी दिल्ली: फक्त एक कॉल येईल आणि तुमचे बॅंक अकाउंट पूर्ण रिकामे होईल. येणारा कॉलही असा असेल की तुम्हाला थोडासाही संशय येणार नाही. कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला आपण फोन पे चे कर्मचारी असल्याचे सांगेल आणि नंतर तुमच्या पैशांची चोरी केली जाईल. तुमच्या नकळत तुम्हाला गंडा घातला जाईल. ही कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला 'फोन पे'द्वारे कॅगबॅक मिळाल्याचे सांगते. त्यानंतर आपल्याला एका रिवार्डपे बटनावर क्लिक करण्यास सांगितले जाते. तुम्ही या बटनावर क्लिक केल्याबरोबर तुमच्या बॅंक खात्यातील रक्कम गायब होते. हल्ली अशा सायबर चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. विशेषत: फोन पे (PhonePe UPI)शी जोडलेल्या नंबरांना मोठ्या प्रमाणावर फसवले जाते आहे. महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांनी यासंदर्भातील अलर्टदेखील दिले आहे.

पोलिसांकडून अलर्ट


काही अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यात ग्राहकांनी कॉलवर सांगितल्याप्रमाणे क्लिक केले आणि त्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम गायब झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तुम्ही अशा बनावट लिंक किंवा बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बॅंक खात्याशी निगडीत सर्व माहिती अशा सायबर चोरांपर्यत पोचते. तुमचे बॅंक खाते, इंटरनेट बॅंकिंग क्रेडेन्शियल इत्यादी महत्त्वाची माहिती चोरांपर्यत पोचते. हे सायबर गुन्हेगार तुम्हाला कॉल करतात आणि आपण फोन पे चे कर्मचारी असल्याचे तुम्हाला सांगतात. त्यानंतर तुम्हाला कॅशलेस पेमेंटच्या बदल्यात कॅशबॅकची ऑफर दिली जाते. यासाठी तुम्हाला फोन पे चे एक नोटिफिकेशन पाठवले जाते. त्यात एक मेसेज आलेला असतो. त्यानंतर हे सायबर गुन्हेगार तुम्हाला सांगतात की त्या मेसेजला क्लिक करा आणि तुम्हाला कॅशबॅक मिळेल. परंतु प्रत्यक्षात होते मात्र उलटेच. तुम्ही क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक करण्यास सांगितले जाते. तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करण्यासाठी युपीआय पिन नंबर टाकला की तुमच्या खात्यातील सर्व रक्कम गायब झालेली असते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

असे होतात सायबर गुन्हे


सायबर गुन्हेगार कॅशबॅकचा मोह दाखवून तुम्हाला रिक्वेट मनी (Request Money)ची लिंक पाठवतात. त्या लिंकबरोबर ते कॅशबॅकचा मेसेजसुद्धा टाकतात. कॅशबॅक मिळवण्याच्या घाईत ग्राहक तो मेसेज नीट समजूनदेखील घेत नाहीत. अशा प्रकारे फोन पेच्या नोटिफिकेशनद्वारे मेसेज येतो. कॉल करणारी व्यक्ती तुम्ही बोलण्यात गुंतवून तुम्हाला पटकन तुमचा बॅलन्स चेक करण्यास सांगते. तुम्ही लगेच तुमचा युपीआय पिन टाकता आणि त्यांच्या जाळ्यात सापडता. तुमच्या खात्यातील सर्व रक्कम गायब केली जाते.

सायबर गुन्ह्यांपासून सावध कसे राहाल


१. फोन पे ग्राहकांसाठी आलेल्या नोटिफिकेशनचा मेसेज नीट वाचावा.
२. कॅशबॅकसाठी आलेल्या मेसेजवर क्लिक करण्याऐवजी लगेचच सावध व्हावे.
३. फोनवर बोलत असताना कधीही कोणत्याही अॅपमध्ये काम करू नका.
४. सायबर गुन्हेगार नेहमी 'रिक्वेस्ट मनी'चा मेसेज पाठवतात.
५. तुम्हाला बोलण्यात गुंतवून फसवले जाते.
६. कोणतीही कंपनी कॅशबॅकच्या ऑफरचा मेसेज किंवा लिंक पाठवत नाही.
७. याउलट कॅशबॅक नेहमी ऑटोमॅटिक क्रेडिट करण्यात येते.
८. कॅशबॅक ऑफरसाठी कोणतीही कंपनी कधीही कॉल करत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी