Cryptocurrency | भारतात क्रिप्टोकरन्सीचा कायदा येतोय का? पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

Cryptocurrency in India | सध्या भारतातच नव्हे तर जगभरात क्रिप्टोकरन्सीकडे गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. मागील वर्षभरात क्रिप्टोकरन्सीमधील व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: तरुण पिढी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला या गोष्टीची जाणीव आहे की क्रिप्टोकरन्सी हे एक विकसित होत असलेले तंत्रज्ञान आहे. सरकार त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक पावले उचलणार आहे.

Cryptocurrency in India
भारतातील क्रिप्टोकरन्सीचे भवितव्य 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीच्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक
  • तरुणांना चुकीची माहिती देत आणि मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत, अपारदर्शक पद्धतीने जाहिराती करत क्रिप्टोकरन्सीचा विस्तार
  • क्रिप्टोकरन्सीसारख्या अनियंत्रित बाजाराला मनी लॉंडरिंग आणि दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याचे नवीन साधन न होऊ देण्यासारख्या मुद्द्यावरदेखील यात चर्चा

Cryptocurrency in India | नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीसंदर्भात (Cryptocurrency)करण्यात येणाऱ्या जाहिराती (Advertisement), त्याचे प्रमोशन, त्यातील वाढती गुंतवणूक (Investment) या महत्त्वाच्या विषयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी एक महत्त्वाची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिप्टोकरन्सीसारख्या अनियंत्रित बाजाराला मनी लॉंडरिंग (Money Laundering)आणि दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याचे (Terror Funding)नवीन साधन न होऊ देण्यासारख्या मुद्द्यावरदेखील यात चर्चा झाली. या बैठकीत हा मुद्द पुढे आला की तरुणांना चुकीची माहिती देत आणि मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत, अपारदर्शक पद्धतीने जाहिराती करत क्रिप्टोकरन्सीचा विस्तार करण्यात येतो आहे. या बाबींना आळा घालण्यात आला पाहिजे. क्रिप्टोकरन्सीवर आगामी काळात मोठे नियंत्रण (Cryptocurrency regulations), कायदा सरकारकडून आणला जाण्याचे संकेत यातून मिळाले आहेत. (PM Modi chaired the important meeting on Cryptocurrency, is crypto law coming?)

क्रिप्टोकरन्सीकडे तरुण मोठ्या प्रमाणात आकर्षित

सध्या भारतातच नव्हे तर जगभरात क्रिप्टोकरन्सीकडे गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. मागील वर्षभरात क्रिप्टोकरन्सीमधील व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: तरुण पिढी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला या गोष्टीची जाणीव आहे की क्रिप्टोकरन्सी हे एक विकसित होत असलेले तंत्रज्ञान आहे. सरकार त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक पावले उचलणार आहे. या बैठकीत यावरदेखील एकमत झाले की सरकारने पुढील वाटचाल लक्षात घेता यासंदर्भात पावले उचलणे योग्य ठरणार आहे.

जगभरातील तज्ज्ञांचे घेतले मत

क्रिप्टोकरन्सीचे पुढील भवितव्य आणि त्याच्याशी निगडीत मुद्दे यावर सर्वकंष बैठक झाली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, अर्थ मंत्रालय, गृहमंत्रालय यांनी यासंदर्भात खोलात अभ्यास केल्यानंतर आणि सल्लामसलत केल्यानंतर ही बैठक पार पडली आहे. या सर्वांनी क्रिप्टोकरन्सीसंदर्भात देशातील आणि जगातील तज्ज्ञांशी देखील याआधी विस्तृत चर्चा याबाबतीत केली आहे. जगभरातील उदाहरणे आणि चांगल्या व्यवस्थांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

आरबीआयची क्रिप्टोकरन्सीवर टीका

रिझर्व्ह बॅंकेने याआधी अनेकवेळा क्रिप्टोकरन्सीवर आपली परखड मते व्यक्त केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि वित्तीय स्थैर्याला यातून मोठा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची एकूण संख्या आणि त्यातून निर्माण होणारी उलाढाल याबद्दलदेखील शंका असल्याचे मत रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बुधवारीच क्रिप्टोकरन्सीवर टीका करताना म्हटले होते की यातून देशाच्या वित्तीय व्यवस्थेला गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो कारण क्रिप्टोकरन्सीचे मार्केट हे आरबीआयकडून नियंत्रित केलेले नाही. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही.

आरबीआय क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात आणणार डिजिटल करन्सी

आरबीआयच्या अंतर्गत पॅनेलकडून क्रिप्टोकरन्सीसंदर्भात अहवाल पुढील महिन्यात येणे अपेक्षित आहे, त्या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या गव्हर्नरचे मत आले आहे. याआधी मार्च २०२० मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयायने रिझर्व्ह बॅंकेच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला फेटाळले होते. त्यानंतर ५ फेब्रवारी २०२१ला आरबीआयने क्रिप्टोकरन्सीसंदर्भात एक अंतर्गत पॅनेल तयार केले होते. हे पॅनेल आरबीआयला डिजिटल करन्सीचे मॉडेल सुचवणार आहे. आरबीआयने याआधी घोषणा केली आहे की आरबीआयची अधिकृत डिजिटल करन्सी आणण्याची इच्छा आहे. बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या प्रसारासंदर्भात आरबीआयला चिंता असल्याने डिजिटल करन्सीचा विचार केला जातो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी