पीएमसी बँकेच्या प्रमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया, परिस्थिती गंभीर, पण मात करू 

काम-धंदा
Updated Sep 24, 2019 | 14:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

पीएमसी बँकेचे प्रमुख जॉय थॉमस म्हणाले की परिस्थिती गंभीर आहे, पण आम्ही यावर मात करू आणि येत्या सहा महिन्याच्या आत परिस्थिती नियंत्रणात येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

pmc bank md joy thomas first reaction after rbi directs financial restrictions business news in marathi
पीएमसी बँकेच्या प्रमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया, परिस्थिती गंभीर, पण मात करू  

मुंबई :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबई येथील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर पुढील सहा महिन्यांसाठी आर्थिक बंधने लादली आहेत. यानंतर बँकेला नवे कर्ज देणे, ठेवी घेणे अशा अनेक गोष्टींवर अनेक निर्बंध असणार आहेत. या सहा महिन्यांच्या काळात बँकेतील ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपये काढता येणार आहे. या सर्व प्रकारानंतर ठेवीदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहेत. यावर पहिली प्रतिक्रिया देताना पीएमसी बँकेचे प्रमुख जॉय थॉमस म्हणाले की परिस्थिती गंभीर आहे, पण आम्ही यावर मात करू आणि येत्या सहा महिन्याच्या आत परिस्थिती नियंत्रणात येईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

बँकेचा व्यवस्थापक संचालक (एमडी) या नात्याने संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो आणि सर्व ठेवीदारांना हमी देतो की सहा महिन्याच्या आतच अनियमितता सुधारल्या जातील असा विश्वास जॉय थॉमस यांनी व्यक्त केला.  अनियमितता दुर करून निर्बंध हटविण्याचे संपूर्ण प्रयत्न केले जातील. सर्व ठेवीदारांसाठी ही वेळ कठीण आहे. मी तुमची माफी मागतो. पण तुमच्या अडचणी कमी होणार नाही, याची मला कल्पना आहे. कृपया तुम्ही आम्हांला सहकार्य करा, आपण या कठीण परिस्थितीवर मात नक्कीच करू आणि खंबीरपणे पुन्हा उभे राहू असा विश्वास थॉमस यांनी व्यक्त केला. 


ग्राहकांनी घाबरुन जावू नये

आरबीआयने २३ सप्टेंबर २०१९ रोजी हे निर्देश दिले आहेत. आरबीआयच्या या निर्देशात स्पष्ट म्हटलं आहे की, 'रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश हे बँकिंग परवाना रद्द केला असल्याचं मानले जावू नये'.

यासोबतच पीएमसी बँकेच्या वेबसाईटवर गेल्यास तेथेही एक पॉपअप मेसेज येतो ज्यावर आरबीआयने काढलेल्या आदेशाचा उल्लेख करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने लागू केलेले पीएमसी बँकेवर निर्बंध सहा महिन्यांसाठी असणार आहेत. तसेच आरबीआयकडून पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी