पीएनबीने MSME सेक्टरमध्ये ३ लाख जणांना दिले ६७५७ कोटींचे कर्ज

देशातील दुसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीयकृत बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) MSME सेक्टरमध्ये ३ लाख व्यावसायिकांना ६ हजार ७५७ कोटी रुपयांचे कर्ज दिले.

PNB sanctions loans of Rs 6757 crore
पंजाब नॅशनल बँक 

थोडं पण कामाचं

  • पीएनबीने MSME सेक्टरमध्ये ३ लाख जणांना दिले ६७५७ कोटींचे कर्ज
  • पीएनबीने २७ जूनपर्यंत MSME सेक्टरमध्ये ६ हजार ७५७ कोटी रुपयांच्या कर्जाला दिली मंजुरी
  • स्वदेशी पीएनबीचे आत्मनिर्भर भारत योजनेला प्राधान्य

नवी दिल्ली: देशातील दुसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीयकृत बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) MSME सेक्टरमध्ये ३ लाख व्यावसायिकांना ६ हजार ७५७ कोटी रुपयांचे कर्ज दिले. यामुळे अनेक लघु आणि मध्यम व्यावसायिकांना व्यवसायवृद्धी करणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या पत हमी योजनेंतर्गत बँकेने कर्ज दिले. 

पीएनबीने २७ जूनपर्यंत MSME सेक्टरमध्ये ६ हजार ७५७ कोटी रुपयांच्या कर्जाला दिली मंजुरी

संयुक्त राष्ट्रांनी २७ जून २०१७ पासून दरवर्षी २७ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.  “एमएसएमई: सामाजिक गरजांना प्रथम प्रतिसाद देणारे” हे यंदाच्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम दिवसाचे सूत्र होते. भारत सरकारनेही  एमएसएमईला वेगळे उपक्रम म्हणून मान्यता दिली आहे. याचे भान ठेवून पीएनबीने २७ जूनपर्यंत MSME सेक्टरमध्ये ६ हजार ७५७ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली.

लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्यांना कर्जफेडीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

कोरोना संकटामुळे देशात २५ मार्चपासून दीर्घकाळ लॉकडाऊन होते. या काळात अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांचे आर्थिक गणित कोलमडले. या व्यावसायिकांना नव्याने उभे करुन त्यांच्या व्यवसायाला पुन्हा चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पत हमी योजनेंतर्गत बँकांमार्फत कर्ज वाटपाची घोषणा केली होती. तसेच लॉकडाऊनमुळे ज्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले, कर्जाची परतफेड करणे अवघड झाले अशांसाठी कर्जाच्या परतफेडीची मुदत सरकारच्या सूचनेनुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

भारतात MSME सेक्टरमध्ये ६.३३ कोटींपेक्षा जास्त लघु आणि मध्यम स्वरुपाचे व्यावसायिक

भारतात MSME सेक्टरमध्ये ६.३३ कोटींपेक्षा जास्त लघु आणि मध्यम स्वरुपाचे व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना वित्त पुरवठा करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने अनेक कर्ज योजना तयार केल्या आहेत. या योजनांमुळे व्यावसायिक अल्पावधीत आर्थिक अडचण दूर करुन व्यवसायवृद्धी करू शकतील आणि कर्जाची परतफेड सुलभ हप्त्यांमध्ये करू शकतील, अशी माहिती बँक व्यवस्थापनाने दिली आहे. 

केंद्र सरकारची २० लाख कोटी रुपयांची आत्मनिर्भर भारत योजना

केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांची आत्मनिर्भर भारत योजना जाहीर केली आहे. या योजनेत बँकांमार्फत पत हमी योजनेंतर्गत लघु आणि मध्यम व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीसाठी कर्ज देण्याची योजना आहे. या योजनेनुसार पंजाब नॅशनल बँकेने लघु आणि मध्यम व्यावसायिकांना कर्ज वाटप केले आहे. बँकेच्या या कामगिरीचे सीआयआयनेही कौतुक केले आहे. 

स्वदेशी पीएनबीचे आत्मनिर्भर भारत योजनेला प्राधान्य

पंजाब नॅशनल बँकेची स्थापना लाहोरमध्ये १८९४ मध्ये झाली. तत्कालीन अविभाजीत भारतात राहणाऱ्या स्थानिक संपन्न नागरिकांनी या बँकेसाठी भांडवल दिले होते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ही भारताची पहिली भारतीय भांडवलावर उभी राहिलेली बँक. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९६९ मध्ये १३ बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. यात पीएनबीचाही समावेश होता. राष्ट्रीयकरण झाल्यानंतर बँकेचा विस्तार होत गेला आणि आज पंजाब नॅशनल बँक ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक झाली आहे. स्वदेशी भांडवलातून सुरू झालेल्या या बँकेने आत्मनिर्भर भारत या योजनेला प्राधान्य दिले आहे. जास्तीत जास्त लघु आणि मध्यम व्यावसायिकांना कर्जाच्या माध्यमातून सक्षम होण्यासाठी मदत करण्यासाठी बँक प्रयत्न करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी