नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसद्वारे ग्रामीण भागासाठी इन्श्युरन्स योजना किंवा पॉलिसी चालवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या 'रुरल पोस्टल लाईफ इन्श्युरन्स'अंतर्गत (आरपीएलआय) या योजना चालवल्या जातात. आरपीएलआयची सुरूवात १९९५ मध्ये करण्यात आली होती. ३१ मार्च २०१७ पर्यत आरपीएलआयद्वारा १४६ लाख पॉलिसी ग्राहकांपर्यत पोचवण्यात आल्याची माहिती इंडिया पोस्टच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. आरपीएलआय सर्वसामान्य नागरिकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन सहा प्रकारच्या विमा योजना उपलब्ध करून देत असते. पोस्ट ऑफिसच्या 'ग्राम सुमंगल' (Gram Sumangal)या योजनेबद्दल जाणून घेऊया.
ग्राम सुमंगल ही एक मनी बॅक इन्श्युरन्स पॉलिसी आहे. या पॉलिसीतील सम अश्युअर्ड १० लाख रुपये आहे. ज्या नागरिकांना आपल्या गुंतवणुकीतून नियमित परतावा हवा आहे त्यांच्यासाठी ही पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे. विमाधारक जीवंत असेपर्यत त्याला नियमितपणे मनीबॅकचा लाभ मिळत राहतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसीच्या नॉमिनीला सर्व सम अश्युअर्ड आणि बोनस मिळतो. या पॉलिसीत २,८५० रुपयांचा प्रिमियम भरल्यानंतर २० वर्षांनंतर जवळपास १४ लाख रुपये मिळतात.
ग्राम सुमंगल पॉलिसीचा कालावधी १५ वर्षे आणि २० वर्षे असा आहे. ही पॉलिसी घेण्यासाठी किमान १९ वर्षे वय असणे आवश्यक आहे. तर पॉलिसी घेण्यासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. ४० वर्षी पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसीचा कालावधी २० वर्षांचा असतो.
ग्राम सुमंगल पॉलिसीमध्ये १५ वर्षांसाठी पॉलिसी घेतल्यानंतर पॉलिसी घेण्यास ६, ९ आणि १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सम अश्युअर्डच्या २० - २० टक्के मनीबॅकचा लाभ मिळतो. तर पॉलिसीच्या मॅच्युरिटीच्या वेळेस ४० टक्के मनी बॅकची रक्कम आणि बोनसची रक्कम मिळते. जर पॉलिसीचा कालावधी २० वर्षे असेल तर ८, १२ आणि १६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर २० - २० टक्के मनी बॅक रकमेचा लाभ मिळतो. तर पॉलिसीच्या मॅच्युरिटीच्या वेळेस ४० टक्के मनी बॅकची रक्कम आणि बोनस रकमेचा लाभ मिळतो.
ग्राम सुमंगल पॉलिसीला एन्डोव्हमेंट अश्युरन्स (Endowment Assurance)योजनादेखील म्हणतात. इंडिया पोस्टच्या मोबाईल अॅपवर दिलेल्या माहितीनुसार सध्या या पॉलिसीसाठी ४८ रुपये बोनस देण्यात येतो आहे. जर 'अ' चे वय २५ वर्षे आहे आणि त्यानं ७ लाख रुपयांचा सम अश्युअर्ड २० वर्षांच्या कालावधी घेतला आहे तर 'अ'चा मासिक प्रिमियम २,८५३ रुपये इतका असेल. याच पद्धतीने तिमाही प्रिमियम ८,४४९ रुपये, सहामाही प्रिमियम १६,७१५ रुपये आणि वार्षिक प्रिमियम ३२,७३५ रुपये इतका असेल.
या पॉलिसीअंतर्गत ८, १२, १६व्या वर्षी १.४ - १.४ लाख रुपये मिळतील. २० व्या वर्षी २.८ लाख रुपये सम अश्युअर्ड स्वरुपात मिळेल. तर प्रति हजार रुपयांच्या सम अश्युअर्डसाठी ४८ रुपये बोनस स्वरुपात मिळणार आहेत. याच पद्धतीने ७ लाख रुपयांच्या सम अश्युअर्डसाठी वार्षिक बोनस ३३,६०० रुपये इतका असतो. २० वर्षात ही रक्कम ६.७२ लाख रुपये इतकी होती. तर २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण १३.७२ लाख रुपये पॉलिसीधारकाला मिळतात. याशिवाय मनीबॅकच्या रुपात ४.२ लाख रुपये याआधीच मिळालेले असतील. पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यानंतर 'अ'ला एकरकमी ९ लाख ५२ हजार रुपये मिळतील.