Post Office Scheme:नवी दिल्ली : काही योजनांमधील नियमित गुंतवणूक (Investment) तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. अशीच एक योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (PPF). ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते. पोस्ट ऑफिसद्वारेदेखील (Post Office)ही योजना चालवली जाते. ही एक अल्पबचत योजना (Small savings scheme)आहे. पीपीएफची ही योजना दीर्घकालावधीत मोठी रक्कम उभारण्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. यावर बाजारातील चढउतारांचा कोणताही परिणाम होत नाही. दर तिमाहीला सरकार याचे व्याजदर निश्चित करते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के वार्षिक व्याजदर मिळतो आहे. (Post office: Investment in PPF will make you crorepati)
पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या शाखेत खाते सुरू करू शकता. हे खाते फक्त ५०० रुपयांमध्ये सुरू होते. यात वर्षभरात कमाल १.५ लाख रुपयांपर्यत पैसे जमा करता येतात. या खात्याचा कालावधी किंवा या गुंतवणुकीचा कालावधी १५ वर्षांचा असतो. मॅच्युरिटीनंतर याच ५-५ वर्षांचा कालावधी वाढवता येतो. यात दरमहिन्याला १२,५०० रुपयांची गुंतवणूक तुम्ही करू शकता. जर नियमितपणे दरमहा १२,५०० रुपयांची गुंतवणूक केली तर १५ वर्षांनी मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला एकूण ४०.६८ लाख रुपये मिळतील. यामध्ये २२.५० लाख रुपयांचे भांडवल असेल तर १८.१८ लाख रुपयांचे व्याज मिळेल. दरवर्षी ७.१ टक्के व्याज १५ वर्षांसाठी मिळेल हे लक्षात घेऊन हे गणित केले आहे. पीपीएफमधील चक्रवाढ ही वार्षिक आधारावर होते.
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर १५ वर्षांनंतर ५-५ वर्षांसाठी याचा कालावधी दोनवेळा वाढवावा लागेल. म्हणजेच गुंतवणुकीचा एकूण कालावधी २५ वर्षांचा होईल. याप्रमाणे २५ वर्षांनी तुमची एकूण रक्कम १.०३ कोटी रुपये होईल. या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक ३७.५० लाख रुपये असेल तर तुम्हाला मिळालेले व्याज ६५.६८ लाख रुपये इतके असेल. हे लक्षात घ्या की जर तुम्हाला पीपीएफचा कालावधी वाढवायचा असेल तर मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधीच अर्ज द्यावा लागेल. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी वाढवता येत नाही.
पीपीएफ योजनेचा सर्वात मोठा फायदा असा की यामध्ये इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन ८० क नुसार करवजावटीचा लाभ मिळतो. या योजनेत १.५ लाख रुपयांपर्यतच्या रकमेवर कर बचतीचा लाभ मिळतो. पीपीएफ मध्ये मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटीला मिळणारी एकूण रक्कम करमुक्त असते. याच प्रमाणे पीपीएफमधील गुंतवणूक ईईई या श्रेणीमध्ये येते. या योजनेत गुंतवणुकदारांना त्यांच्या रकमेवर पूर्ण सुरक्षितता मिळते. यामध्ये कमावलेल्या व्याजावर सरकारकडून गॅरंटी दिली जाते. करबचतीबरोबर सुरक्षितता आणि चक्रवाढ वाढीचा लाभ यामुळे पीपीएफमधील गुंतवणूक अत्यंत फायद्याची ठरते.