सुरक्षित, नियमित उत्पन्न आणि कर्जदेखील उपलब्ध, जाणून घ्या पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त योजना

काम-धंदा
Updated May 03, 2021 | 18:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

पोस्ट ऑफिसची आरडी योजनादेखील (Post Office RD) सुरक्षित आणि इतर सुविधा देणारी योजना आहे. एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिसच्या आरडीवर ५.८ टक्के वार्षिक व्याज दिले जाते आहे.

Post Office RD scheme
पोस्ट ऑफिसची आरडी योजना 

थोडं पण कामाचं

  • पोस्ट ऑफिसची योजना
  • आरडी खाते
  • ५.८ टक्के वार्षिक व्याज

नवी दिल्ली : पगारदार मध्यमवर्गीयांसाठी रिकरिंग डिपॉझिट (RD)हा एक सुरक्षित पर्याय समजला जातो. पोस्ट ऑफिसची आरडी योजनादेखील (Post Office RD) 
अशीच सुरक्षित आणि इतर सुविधा देणारी योजना आहे. एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिसच्या आरडीवर ५.८ टक्के वार्षिक व्याज दिले जाते आहे. आरडीद्वारे मिळणारे व्याज हे करपात्र असते. आरडीची खासियत म्हणजे यात त्रैमासिक चक्रवाढवृद्धीचा लाभ मिळतो. आरडीमध्ये नागरिक नियमित निश्चित रकमेची गुंतवणूक करू शकतात आणि त्यावर व्याज मिळवू शकतात.

Post Office RD : पोस्ट ऑफिसच्या आरडी मध्ये कर्जाची सुविधादेखील आहे. कर्जाची सुविधा १२ हफ्ते जमा झाल्यानंतर मिळते. खात्यात जमा केलेल्या रकमेच्या ५० टक्के रकमेइतके कर्ज मिळू शकते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा मासिक हफ्त्यांनी केली जाऊ शकते.

पोस्ट ऑफिसची आरडी

पोस्ट ऑफिसची आरडी पाच वर्षांसाठीची असते. या योजनेमध्ये किमान १०० रुपये प्रति महिना किंवा १० रुपयांच्या पटीत कोणत्याही रकमेत खाते उघडता येते. तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसची आरडी ही सरकारचे पाठबळ असलेली योजना आहे.

खाते कोण उघडू शकते


पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये वैयक्तिक खाते, संयुक्त खाते (३ व्यक्ती), कायद्याने अज्ञान खाते उघडू शकतात. १० वर्षांवरील मुले आणि मानसिक रुपाने विकलांग व्यक्तीसाठी खाते उघडता येते. या योजनेत कितीही खाते उघडता येतात.

डिपॉझिटची रक्कम


या योजनेत खाते रोख रकमेद्वारे किंवा चेकद्वारे सुरू करता येते. या योजनेत किमान १०० रुपये प्रति महिना आणि त्याहून अधिक १० रुपयांच्या पटीत रुपये जमा करता येतात. जर महिन्याच्या सुरूवातीच्या १५ दिवसांमध्ये खाते सुरू केले असेल तर तुम्हाला दर महिन्याच्या १५ तारखेपर्यत पैसे जमा करावे लागतील. तर तुम्ही महिन्यांच्या शेवटच्या १५ दिवसांत खाते उघडेल असेल तर तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी पैसे जमा करावे लागतील.

प्री-क्लोजर


आरडी खाते सुरू केल्यानंतर तीन वर्षांनी आरडी खाते मॅच्युरिटीच्या आधी बंद करता येते. आरडी खाते मॅच्युरिटीच्या आधीच बंद केल्यावर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचे व्याज तुम्हाला मिळते.

कर्जाची सुविधादेखील उपलब्ध


पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये कर्ज घेण्याचीदेखील सुविधा आहे. आरडी खात्यात १२ हफ्ते जमा झाल्यानंतंर कर्जाची ही सुविधा मिळते. आरडी खात्यात जमा झालेल्या रकमेच्या ५० टक्के रकमेइतके कर्ज घेतले जाऊ शकते. कर्जाची परतफेड करताना एकरकमी किंवा समान मासिक हफ्त्यांनी केली जाऊ शकते. कर्जावर व्याजदर हे आरडीवरील व्याज अधिक २ टक्के इतके असते. कर्ज घेतल्याच्या दिवसापासून ते कर्जाच्या परतफेडीच्या तारखेपर्यतच्या कालावधीसाठी व्याज लागते. जर मॅच्युरिटीपर्यत कर्जाची परतफेड झाली नाही तर कर्ज अधिक व्याज इतकी रक्कम मॅच्युरिटीच्या रकमेतून कापली जाते. संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसहीत कर्जाचा अर्ज जमा करून कर्ज घेतले जाऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी