PPF Investment: पीपीएफमधील पैसे मुदतीपूर्वी काढणं शक्य; पाहा कधी पैसे काढू शकता

काम-धंदा
Updated Jun 12, 2019 | 15:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

PPF Investment: पीपीएफमध्ये पैसे गुंतवलेल्यानंतर तुम्हाला ते १५ वर्षांनंतरच काढता येतात. पण, गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीपूर्वी त्यातील निम्मी रक्कम काढता येणं शक्य आहे. हा नियम अनेकांना माहिती नसल्याचे दिसत आहे.

PPF account
पीपीएफमधील पैसेही काढणे शक्य  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: PPF Investment: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफमधील गुंतवणूक टॅक्स वाचवण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. पण, दुसऱ्या बाजूला एकदा पीपीएफमध्ये गुंतवणूक केली आणि पैशांची गरज लागली तर, ते गुंतवलेले पैसे काढणं अशक्य असतं. त्यामुळं टॅक्स सेव्हिंग बेनिफिट असतानाही अनेकजण पीपीएफच्या गुंतवणुकीकडं नाक मुरडतात. पीपीएफमध्ये पैसे गुंतवलेल्यानंतर तुम्हाला ते १५ वर्षांनंतरच काढता येतात. पण, गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीपूर्वी (१५ वर्षांच्या मुदतीपूर्वी) त्यातील निम्मी रक्कम काढता येणं शक्य आहे. मुळात नोकरदारांसाठी किंवा मध्यमवर्गासाठी आतिशय फायदेशीर गुंतवणूकपर्याय असतानाही अनेकांना या नियमाची माहितीच नसल्यामुळे पीपीएफच्या गुंतवणुकीविषयी नकारात्मक मत तयार झाले आहे. त्यामुळे नोकरदार वर्गही आपल्या बजेटनुसार पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो. त्याला त्याच्या वेळेनुसार पैसे काढण्याची मुभाही देण्यात आलेली आहे. त्यासाठी पीपीएफचा हा नियम माहिती करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.

कधी काढाल पैसे?

पीपीएफमधील गुंतवणुकीला १५ वर्षांची मुदत आहे. एकदा पैसे गुंतवले की ते अडकून पडतात, अशी धारणा आहे. अर्थात ती चुकीची आहे. नियमानुसार प्रत्येकाला वर्षाला दीड लाख रुपये पीपीएफमध्ये गुंतवता येतात. त्या दीड लाख रुपयांवर संबंधिताला टॅक्स सेव्हिंग बेनिफिट मिळतो. म्हणजे, दीड लाख रुपये पीपीएफमध्ये गुंतवले तर, त्यावरच कर भरावा लागत नाही. सध्या पीपीएफवर वार्षिक आठ टक्के व्याज मिळते. पण, पीपीएफच्या गाईड लाईन्सनुसार गुंतवणूकदाराला एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्के रक्कम मुदतीपूर्वी काढता येणे शक्य आहे. पण त्यासाठी पाच वर्षांचा गुंतवणूक कालावधी असणं गरजेचं आहे. त्या पाच वर्षांची गणनादेखील वेगळ्या पद्धतीने होते. म्हणजेच, सप्टेंबर २०१८मध्ये पीपीएफमध्ये एक लाख रुपये गुंतवले तर, एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ हे गुंतवणूक झालेला आर्थिक वर्ष गृहित धरले जात नाही. तर, एप्रिल २०१९पासून पुढची पाच आर्थिक वर्षे धरली जातात. म्हणजेच, सप्टेंबर २०१८मध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयातील ५० हजार रुपये मार्च २०२४ नंतरच काढता येणे शक्य आहे. अर्थात या गणितामुळे पाच वर्षांनंतर म्हणण्यापेक्षा सहा वर्षांनंतर ५० टक्के रक्कम काढता येते असे म्हटले तर योग्य ठरणारे आहे.

करमुक्त गुंतवणूक

प्राप्तिकर कायदा १९६१मधील कलम ८०-सीनुसार पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमधील दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त आहे. त्यामुळे नोकरदारांसाठी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो. वर्षाला दीड लाख रुपये यामध्ये गुंतवणे शक्य असते. विशेष म्हणजे पाच वर्षांनंतर गुंतवणुकीतील ५० टक्के रक्कम काढून घेतल्यास ती रक्कमही करमुक्तच असते. पीपीएफमधील गुंतवणूक ही ईईई कॅटेगरीमध्ये येते म्हणजेच, पीपीएफमधील गुंतवणूक, त्यावरील व्याज आणि गुंतवणुकीतून रक्कम काढण्यावर कोणत्याही प्रकाराचा कर लागू होत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी