पत्नीच्या नावे उघडा पीपीएफ खाते, करावर सूट शिवाय मिळतील ५१ लाख रुपये

काम-धंदा
Updated Apr 15, 2021 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

दीर्घकालावधीपासून गुंतवणुकीसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (PPF) हा एक चांगला पर्याय समजण्यात येतो. यामध्ये चांगल्या परताव्यासोबतच अनेक प्रकारचे करसवलतदेखील मिळते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के इतके व्याज

PPF account for wife gives additional benefits
पत्नीच्या नावे पीपीएफ खाते देते अतिरक्त सूट आणि लाभ 

थोडं पण कामाचं

  • पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ
  • पीपीएफवर ७.१ टक्के इतके व्याज
  • पत्नीच्या नावे खाते सुरू केले तर मोठी सूट

नवी दिल्ली : छोट्या रकमेच्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभारायची असल्यास पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (PPF) हा उत्तम पर्याय आहे. दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठीचा हा एक लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजासह जम करण्यात आलेल्या रकमेसहीत सर्व करमुक्त असते. याशिवाय जर तुम्ही पत्नीच्या नावे पीपीएफ खाते सुरू केले तर यामध्ये आणखी सूट मिळते.

पीपीएफ (PPF)खाते पत्नीच्या नावे उघडताना पत्नी गृहिणी असो कि नोकरदार दोन्हीही स्थितीत तुम्ही यात सहजपणे गुंतवणूक करू शकता. पीपीएफमधील गुंतवणूक खूपच सुरक्षित समजली जाते. याशिवाय यात हमखास चांगला परतावादेखील मिळतो. यामध्ये पत्नीच्या नावे खाते उघडल्यास १.५ लाख रुपयांपर्यतची रक्कम गुंतवता येते.

पीपीएफवर ७.१ टक्के व्याज


पीपीएफवर सध्या ७.१ टक्के वार्षिक व्याज मिळते आहे. यामध्ये दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने व्याज जोडले जाते. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेते. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता व्याजदरातील बदलांची शक्यता नाही. पीपीएफ खात्यात दरवर्षी १.५ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम गुंतवता येत नाही. एक व्यक्ती एकच पीपीएफ खाते उघडू शकते. अर्थात यात तुम्ही कायद्याने अज्ञान मुलांच्या नावेदेखीळ खाते उघडू शकता. मात्र यात संयुक्तरित्या खाते उघडता येत नाही. पीपीएफ खाते सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी किमान ५०० रुपये गुंतवावे लागतात.

५१ लाखांची रक्कम कशी मिळू शकते


जर तुमची पत्नी दरवर्षी पीपीएफमध्ये १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करेल तर १८ वर्षांच्या कालावधीनंतर गुंतवलेली एकूण रक्कम जवळपास २७ लाख इतकी असेल. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के इतके व्याज मिळते आहे. हे लक्षात मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला जवळपास ५१ लाख रुपयांची घवघवीत रक्कम मिळेल. या प्रकारे तुमच्याकडे एक मोठी रक्कम जमा झालेली असेल.

पीपीएफ केंद्र सरकारची योजना

पीपीएफ ही केंद्र सरकारची एक गुंतवणूक योजना असून यात चांगला परतावा मिळतो. शिवाय सरकारी योजना असल्यामुळे जोखीम नसते. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन भविष्यातील चांगल्या आर्थिक तजवीजीसाठी पीपीएफ हा अतिशय उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. सध्या पीपीएफमध्ये ७.१ टक्के व्याज मिळत असून बॅंकांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा पीपीएफवर चांगले व्याज मिळते आहे.  

आर्थिक नियोजन करताना अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची आखणी करणे आवश्यक असते. यामध्ये जोखीम, गुंतवणुकादाराचे वय, सांपत्तिक स्थिती, भविष्यातील आर्थिक गरजा इत्यादी अनेक घटकांना लक्षात घेऊन नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. काही गुंतवणूक पर्याय हे जोखमीचे असतात मात्र त्यात परतावा अधिक असतो. तर काही गुंतवणूक पर्यायांमध्ये जोखीम कमी असते आणि परतावादेखील कमी असतो. अशावेळी या दोन्ही प्रकारच्या पर्यायांचा आपले वय, जोखीम क्षमता, गुंतवणूक कालावधी इत्यादी बाबींचा विचार करून आणि तज्ज्ञांशी चर्चा करून ताळमेळ आपल्या आर्थिक नियोजनात घालायचा असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी