प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना: फक्त १२ रुपयांच्या प्रिमियममध्ये मिळवा २ लाखांचा विमा, पॉलिसीची वैशिष्ट्ये

काम-धंदा
Updated May 04, 2021 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारकडून प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना चालवली जाते आहे. यामध्ये फक्त १२ रुपयांचा वार्षिक हफ्ता भरून विमाधारकाला २ लाख रुपयांपर्यतचा विमा मिळतो.

Pradhan Mantri Bima Yojana
प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना 

थोडं पण कामाचं

  • फक्त १२ रुपयांच्या प्रिमियममध्ये मिळवा २ लाखांचा विमा
  • दुर्बल घटकांसाठी आर्थिक सुरक्षा
  • अपघात विमा

नवी दिल्ली: भविष्यात कुटुंबाला येणाऱ्या अडचणींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विमा करणे आवश्यक आहे. कमावत्या व्यक्तीच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक गरजांचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यासाठी आयुर्विमा घेणे महत्त्वाचे असते. मात्र गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विम्याचा प्रिमियम भरणे शक्य होत नाही. या प्रकारच्या वर्गातील लोकांसाठी सरकारकडून प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना चालवली जाते आहे. यामध्ये फक्त १२ रुपयांचा वार्षिक हफ्ता भरून विमाधारकाला २ लाख रुपयांपर्यतचा विमा मिळतो.

हा अॅक्सिडेंट विमा किंवा पॉलिसी आहे. इतर अॅक्सिडेंट इन्श्युरन्स पॉलिसीच्या तुलनेत ही पॉलिसी खूपच स्वस्त आहे. सरकारने दुर्बल घटकांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी ही योजना २०१५ मध्ये सुरू केली होती. ही पॉलिसी नेमकी काय आहे आणि योजनेची माहिती विस्ताराने जाणून घेऊया.

अपघाताने मृत्यू झाल्यास करता येतो क्लेम


प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेअंतर्गत विमाधारकाचा एखाद्या अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना किंवा नॉमिनीला दोन लाख रुपये मिळतात. तर अपघातामुळे जर विमाधारक अंशत: अपंग झाला तर त्याला १ लाख रुपये मिळतात. जर विमाधारक पूर्णत: अपंग झाला तर त्याला पूर्ण दोन लाख रुपये दिले जातात.

ही पॉलिसी कोण घेऊ शकतो


या पॉलिसीचा लाभ १८ वर्षांपासून ते ७० वर्षांपर्यतच्या वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. या पॉलिसीत विमाधारकाच्या बॅंक खात्यातून दरवर्षी आपोआप १२ रुपयांचा प्रिमियम कापला जातो. जर तुम्हाला ही पॉलिसी सरेंडर करायची असेल तर ज्या बॅंकेत तुमचे खाते आहेत तिथे एक अर्ज देऊन तुम्ही ही पॉलिसी बंद करू शकता.

या पॉलिसीसाठी अर्ज कसा करावा


प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पॉलिसीधारकाकडे अॅक्टिव्ह बॅंक बचत खाते असले पाहिजे. शिवाय हे बॅंक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे. अर्ज करण्यासाठी योजनेचा फॉर्म भरावा आणि त्यासोबत आधार कार्ड, बॅंक खात्याचे पासबुक, जन्माचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला यांची फोटोकॉपी जोडावी. तसेच पासपोर्ट साईज फोटोसुद्धा द्यावा. या पॉलिसीसंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही https://jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांच्या दैनंदिन गरजा, भविष्यातील आर्थिक गरजा, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, आपत्कालीन खर्च यासाठीची तरतूद आधीच करणे आवश्यक असते. विमा हा आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक गरजांची तरतूद विम्याच्या रकमेने करता येते. त्यामुळेच आयुर्विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. जितक्या तरुण वयात विमा घेतला तितकाच विम्याचा हफ्ता किंवा प्रिमियम हा कमी असतो. त्यामुळे कमीत कमी हफ्त्यात जास्तीत जास्त रकमेचा विमा घेता येतो.

आयुर्विम्यासोबतच आरोग्य विमा असणेदेखील आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना वैद्यकीय खर्चासाठी मोठा खर्च येतो आहे. अचानक उद्भवणारा मोठा वैद्यकीय खर्च तुमची अनेक वर्षांची बचत संपवू शकतो. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आरोग्य विमा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अचानक आलेल्या वैद्यकीय खर्चासाठी धावपळ करायची वेळ येत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी