तुमच्या बॅंक खात्याला जनधन खात्यात कसे बदलाल, कोणकोणते फायदे मिळतात? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

काम-धंदा
Updated May 04, 2021 | 19:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

या योजनेअंतर्गत मिनिमम बॅलन्सचे टेन्शन नाही, सरकारी सुविधांचा लाभ, अपघात विमा यासह अनेक फायदे मिळतात. जर तुम्हाला जनधन खाते सुरू करायचे असेल तर तुम्ही बॅंकेत जाऊन सुरू करू शकता.

 Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY)
प्रधानमंत्री जनधन योजना 

थोडं पण कामाचं

  • जनधन खाते
  • खाते उघणे अतिशय सोपे
  • मिळतो अनेक सरकारी योजनांचा लाभ

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhanmantri Jandhan Yojna)जवळपास सहा वर्षांपूर्वी सुरू झाली होती. देशात आतापर्यत या योजनेचा लाभ ४० कोटी नागरिकांना झाला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने या जनधन खात्यांमध्ये ५००-५०० रुपये जमा केले होते. या योजनेअंतर्गत मिनिमम बॅलन्सचे टेन्शन नाही, सरकारी सुविधांचा लाभ, अपघात विमा यासह अनेक फायदे मिळतात. २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींनी ही योजना सुरू केली होती. जर तुम्हाला जनधन खाते सुरू करायचे असेल तर तुम्ही बॅंकेत जाऊन सुरू करू शकता. 

Pradhan Mantri Jan-Dhan Yojana (PMJDY) :

जर आतापर्यत तुम्ही जनधन खात्याशी जोडले गेले नसाल आणि तुमच्याकडे आधीपासूनच एखादे सर्वसामान्य बॅंक खाते किंवा बचत खाते असेल तर त्या बॅंक खात्याला तुम्ही जनधन खात्यात बदलू शकता. याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी काय काय करावे लागेल, याचे फायदे काय आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया विस्ताराने...

आपले बॅंक खाते जनधन खात्यात कसे रुपांतरित करावे ?


तुम्ही तुमच्या बचत खात्याला किंवा सेव्हिंग्स अकाऊंटला जनधन खात्यात बदलू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या बॅंकेच्या शाखेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला रुपे कार्डसाठी (RuPay Card) अर्ज करावा लागेल. यासाठी आवश्यक तो फॉर्म भरून बॅंकेत जमा करा. हा फॉर्म बॅंकेकडून स्वीकारण्यात आल्यानंतर तुमचे बचत खाते जनधन खात्यात रुपांतरित होईल.

जनधन खात्यात कोणते फायदे मिळतात?


या खात्यात तुम्हाला किमान बॅलन्स ठेवण्याची गरज नसते.
या खात्यात बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळते.
यामध्ये फ्री मोबाईल बॅंकिंगची सुविधा मिळते
२ लाख रुपयांपर्यत अपघात विमा संरक्षण मिळते
१०,००० रुपयांपर्यत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.
३०,००० रुपयांपर्यतचे लाईफ कव्हर मिळते. (विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर आवश्यक अटींची पूर्तता केल्यानंतर ही रक्कम मिळते)
कॅश काढण्यासाठी आणि शॉपिंगसाठी वापरण्यास रुपे डेबिट कार्ड (RuPay Card)मिळते

तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळतो काय?


अनेक प्रकारच्या सरकारी योजनांमध्ये या खात्यात सरळ पैसे जमा होतात.
देशभरात पैसे ट्रान्सफर करता येतात.
पीएम किसान आणि श्रमयोगी मानधन यासारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते सुरू होईल.

नवीन खाते उघडायचे असल्यास काय करावे ?


तुम्हाला जर नवीन जनधन खाते सुरू करायचे असल्यास, तुम्ही बॅंकेच्या शाखेत जाऊन सुरू करू शकता. बॅंकेत जनधन खात्याचा फॉर्म भरा. त्यामध्ये तुम्हाला आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, बॅंकेच्या शाखेचे नाव, व्यवसाय किंवा रोजगार, तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या, तुमचे वार्षिक उत्पन्न, नॉमिनी, व्हिलेज कोड किंवा टाऊन कोड यासारखी माहिती द्यावी लागते.

खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे चालतात?


आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी