Share market है तो रिस्क है, रिक्स है तो पैसा है...फक्त १९ वर्षात उभी केली ३ लाख कोटींची कंपनी

मागील दोनच दशकात डी-मार्टने प्रचंड यश मिळवले आहे. डीमार्ट (D-Mart) हे आज घराघरातील नाव बनले आहे. आज या कंपनीचे बाजारमूल्य म्हणजे समभाग भांडवल ३ लाख कोटी रुपयांवर पोचले आहे.

Success of Radhakishan Damani
राधाकिशन दमानी यांचे यश 

थोडं पण कामाचं

  • राधाकिशन दमानी हे भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणुकदार समजले जातात.
  • डी-मार्ट या भारतातील लोकप्रिय रिटेल चेनचे मालक असलेले राधाकिशन दमानी
  • डीमार्टच्या यशामुळे राधाकिशन दमानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत

मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे, व्यवहारांकडे सर्वचजण आकर्षिले जातात. यात शेअर बाजारातील (Share Market) व्यवहार हाताळणारे दलाल किंवा ब्रोकर असतात, मोठमोठ्या गुंतवणुकदार कंपन्या असतात, सर्वसामान्य गुंतवणुकदार असतात. मात्र यातील फक्त थोड्याच लोकांना शेअर बाजारातील अफाट पैसा कमावता येतो. असेच एक नाव आहे, राधाकिशन दमानी (Radhakishan Damani). डी-मार्ट या भारतातील लोकप्रिय रिटेल चेनचे मालक असलेले राधाकिशन दमानी हे भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणुकदार समजले जातात. मागील दोनच दशकात डी-मार्टने प्रचंड यश मिळवले आहे. डीमार्ट (D-Mart) हे आज घराघरातील नाव बनले आहे. आज या कंपनीचे बाजारमूल्य म्हणजे समभाग भांडवल ३ लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. डीमार्टचे सर्व स्टोअरची मुख्य प्रवर्तक कंपनी अव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. ही आहे.  (How a stock broker become the owner of largest retail chain of India, success story Radhakishan Damani)

डीमार्टच्या उत्पन्नात वाढ

इतक्या कमी कालावधीत एवढा मोठा पल्ला गाठणाऱ्या कंपन्यांमध्ये डी-मार्ट १७व्या क्रमांकावर आहे. या वर्षी डी-मार्टच्या शेअरच्या किंमतीत तब्बल ७० टक्क्यांपर्यत वाढ झाली आहे. सध्या या कंपनीचा शेअर ५,११२ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर घोडदौड करतो आहे. या पद्धतीची जबरदस्त घोडदौड करणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बॅंक, इन्फोसिस, एचयुएल, एचडीएफसी लि., आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स, आयटीसी, कोटक महिंद्रा बॅंक, भारती एअरटेल, एसबीआय, ओएनजीसी, विप्रो, एचसीएल आणि एशियन पेंट्स यांचा समावेश आहे. डीमार्टच्या महसूलात एक वर्षात ४६ टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीअखेर डीमार्टने ७,६४९.६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

राधाकिशन दमानींची वाटचाल

डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक आहेत. दमानी यांची ओळख शेअर बाजारातील गुंतवणुकदार, ब्रोकर, ट्रेडर आणि डीमार्टचे संस्थापक म्हणून आहे. दमानी आधी एक सर्वसामान्य स्टॉक ब्रोकर होते. तिथपासून ते आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जाऊन पोचले आहेत. १९५४ मध्ये राधाकिशन दमानी यांचा जन्म मुंबई येथील मारवाडी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील शिव किशन दमानीदेखील स्टॉक ब्रोकर होते. राधाकिशन दमानी यांनी तरुणपणीच स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता.

शेअर बाजाराशी संबंध

राधाकिशन दमानी यांनी स्वत:चा बॉल बेयरिंगचा व्यवसाय सुरू केला होता. वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांनी शेअर बाजारात ब्रोकिंगचे काम सुरू केले होते. मात्र राधाकिशन दमानी यांना वाटले की काहीतरी मोठे करायचे असेल तर स्टॉक ब्रोकिंग करून चालणार नाही. यासाठी शेअर बाजारात गुंतवणुकदार बनावे लागेल. ३२व्या वर्षी त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक सुरू केली. हळूहळू त्यांचा समावेश शेअर बाजारातील आघाडीच्या गुंतवणुकदारांमध्ये झाला. नंतरच्या काळात त्यांनी कन्झ्युमर क्षेत्रातील कंपनी सुरू केली. वॉलमार्टच्या रिटेल चेनचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांना भारतातदेखील असेच काहीतरी करायचे होते. २००२ मध्ये त्यांनी यातूनच डी-मार्ट कंपनीची स्थापना केली.

डीमार्टने सुरूवातीला पहिले स्टोअर मुंबईत पवई येथे सुरू केले. त्यानंतर आपल्या मेहनतीने दमानी यांनी डीमार्टच्या स्टोअरची संख्या वाढवत नेली. सध्या डीमार्टचे देशभरात २२० स्टोअर आहेत. तर राधाकिशन दमानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी