Aviation | टाटांना राकेश झुनझुनवाला देणार टक्कर, विकत घेतली बोईंग ७२ विमाने, दोनच दिवसात १ लाख कोटींचा सौदा

Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या नव्या अकासा एअर या विमानसेवा कंपनीसाठी बोईंगच्या ७२ विमानांची ऑर्डर दिली होती. अकासा एअर आणि बोईंग यांनी दिलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकानुसार अकासा एअरने ७३७ मॅक्स जेटच्या ७२ विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत. ७३७-८ आणि उच्च क्षमता असणारे ७३७-८-२०० यांचा समावेश आहे. अकासा एअर जून २०२२ पर्यत विमानसेवा सुरू करण्याची तयारी करते आहे.

Rakesh Jhunjhunwala's Akasa Air
राकेश झुनझुनवालांची अकासा एअर 
थोडं पण कामाचं
  • राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरने ७२ बोईंग ७३७ विमाने विकत घेतली
  • अलीकडेच अकासा एअरला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र
  • आगामी काळात विमानसेवा क्षेत्रात टाटा आणि राकेश झुनझुनवाला आमनेसामने

Akasa Air | मुंबई : आगामी काळात देशातील हवाई उड्डाण क्षेत्रातील (Aviation sector) स्पर्धा तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. प्रसिद्ध गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या अकासा एअर (Akasa Air)ने ७२ बोईंग ७३७ विमाने विकत घेतली आहेत. तर या बोईंग ७३७ (Boeing 737) विमानांसाठी सीएफएम एलईएपी-१ बी इंजिनांची खरेदी करण्यासाठीचा सौदादेखील केला आहे. राकेश झुनझुनवाला यांनी मोठी गुंतवणूक करत अकासा एअर या नव्या विमानसेवा कंपनीची स्थापना केली आहे. (Rakesh Jhunjhunwala makes deal of Rs 1 lakh crore in just 2 days, buys 72 Boeing planes)

अकासा एअरसाठी इंजिनांसाठी खरेदी

अकासा एअर ने यासंदर्भात माहिती देताना म्हटले आहे की कंपनीने विकत घेतलेल्या बोईंग ७३७ विमानांच्या इंजिनांसाठीची देखरेखीची काळजी या नव्या सीएफएम एलईएपी-१ बी इंजिनांद्वारे घेतली जाणार आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या एअरशो दरम्या सीएफएमबरोबर हा करार करण्यात आला आहे. या सौद्याअंतर्गत अतिरिक्त इंजिन आणि दीर्घकालीन सेवा यांचा समावेश आहे. हा व्यवहार ४.५ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ३३,००० कोटी रुपयांचा आहे.

एक दिवसाआधी विकत घेतली ७२ बोईंग विमाने

एक दिवस आधीच राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या नव्या अकासा एअर या विमानसेवा कंपनीसाठी बोईंगच्या ७२ विमानांची ऑर्डर दिली होती. अकासा एअर आणि बोईंग यांनी दिलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकानुसार अकासा एअरने ७३७ मॅक्स जेटच्या ७२ विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत. ७३७-८ आणि उच्च क्षमता असणारे ७३७-८-२०० यांचा समावेश आहे. 

अकासा एअरची उड्डाणे २०२२ मध्ये

अलीकडेच अकासा एअरला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. या नव्या एअरलाइन्स द्वारे राकेश झुनझुनवाला आता विमानसेवा क्षेत्रात आपले पाऊल टाकत आहेत. या क्षेत्रातील आगामी काळातील मोठ्या संधी लक्षात घेऊन कंपनीचा विस्तार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. अकासा एअरलाइन्सला एअर ऑपरेटिंग परमिट घेणे आणि व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी पहिली डिलिव्हरी २०२२ पर्यत मिळू शकते, अशी माहिती बोईंगने दिली आहे. अकासा एअरने मागील महिन्यातच म्हटले होते की कंपनी जून २०२२ पर्यत विमानसेवा सुरू करण्याची तयारी करते आहे. सर्व  क्लियरन्स मिळाल्यानंतर देशातील सर्वात स्वस्त विमानप्रवास उपलब्ध करून देणारी कंपनी लॉंच केली जाणार आहे.

एअर इंडियाचे पुनरुज्जीवन

याआधी काही दिवसांपूर्वीच टाटा समूहाने एअर इंडियाची खरेदी केली आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एअर इंडियाकडे १२७ विमाने आहेत तर भारतातील एकूण आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी ५०.६४ टक्के व्यवसाय एअर इंडियाकडे आहे. सध्या एअर इंडिया जगभरातील ४२ ठिकाणांना आपली सेवा पुरवते. केंद्र सरकार एअर इंडियामधील आपला संपूर्ण हिस्सा विकते आहे. टाटा समूहाकडे याआधीच एअरएशिया या विमानसेवा कंपनीचा ८४ टक्के हिस्सा आणि विस्तारा एअरलाइन्सचा ५१ टक्के मालकी हिस्सा आहे. त्यामुळे देशाच्या विमानसेवा क्षेत्राच्या अवकाशावर पुन्हा एकदा टाटा समूह भरारी घेणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी