महाराष्ट्रातील सहा सहकारी बँकांचे परवाने रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला, यामुळे जानेवारी २०२१ पासून मागील काही महिन्यांमध्ये राज्यातील परवाना रद्द झालेल्या सहकारी बँकांची संख्या सहा झाली.

RBI cancelled licence of Vasantdada Nagari Sahakari Bank of Osmanabad
महाराष्ट्रातील सहा सहकारी बँकांचे परवाने रद्द 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रातील सहा सहकारी बँकांचे परवाने रद्द
  • उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द
  • व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे बँक अडचणीत

मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील पाच सहकारी बँकांचे परवाने रद्द केले होते. यात आता आणखी एका बँकेची भर पडली. यामुळे जानेवारी २०२१ पासून मागील काही महिन्यांमध्ये परवाना रद्द झालेल्या राज्यातील सहकारी बँकांची संख्या सहा झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. (RBI cancelled licence of Vasantdada Nagari Sahakari Bank of Osmanabad)

सातारा जिल्ह्यात वर्चस्व असलेली कराड जनता सहकारी बँक, कोल्हापूर जिल्ह्यात प्रभाव असलेली सुभद्रा लोकल एरिया सहकारी बँक, मुंबईत सुरू झालेली सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक, जालना जिल्ह्यात वर्चस्व असलेली मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईमधून सुरू झालेली जयभारत क्रेडिट लिमिटेड या पाच सहकारी बँकांचे परवाने भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) आधीच रद्द केले. आता उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवानाही रद्द झाला. 

अवास्तव कर्जवाटप आणि कर्जाच्या वसुलीकडे दुर्लक्ष

महाराष्ट्राच्या सहकार उद्योगाला चालना देण्यासाठी मोठी भूमिका बजावणाऱ्या सहकारी बँका आर्थिक अडचणीत सापडत आहेत. बँकांच्या व्यवस्थापनातील व्यक्तींनी पदाचा गैरवापर करत अवास्तव कर्जवाटप केले. कर्जाच्या वसुलीकडे दुर्लक्ष केले. यामुळे सहकारी बँका अडचणीत सापडत आहेत. बँका अडचणीत सापडत असल्यामुळे हजारो सामान्य नागरिक जे सहकारी बँकांमध्ये बचत करतात त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे बँक अडचणीत

राजकारण आणि अर्थकारणातील वैयक्तिक लाभांसाठी बँक व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य अवास्तव कर्जवाटप आणि कर्जवसुलीकडे दुर्लक्ष हे धोरण स्वीकारत आहेत. रिझर्व्ह बँकेने धोक्याचा इशारा दिला तरी परिस्थिती सावरण्यापेक्षा स्वार्थ साधण्यावरच व्यवस्थापनातील प्रभावी सदस्यांचा भर आहे. यामुळे नियमानुसार कारवाई करुन संबंधित सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचे काम रिझर्व्ह बँक करत असल्याचे चित्र आहे.

उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द

उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१७ मध्ये आर्थिक निर्बंध लागू केले. नव्या ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. हजारो ठेवीदारांना एक हजार रुपये अशा स्वरुपात ठेवीचे पैसे परत केले जात होते. परिस्थिती सावरण्यासाठी व्यवस्थापन वारंवार मुदतवाढ मागून घेत होते. रिझर्व्ह बँकेने सुरुवातीला संधी दिली. पण परिस्थिती सुधारत नसल्याचे बघून अखेर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. 

किमान ९९ टक्के ठेवीदारांना पैसे परत मिळणार

ठेवीदारांनी चिंता करू नये. किमान ९९ टक्के ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. नियमानुसार खात्यात जमा असलेले पैसे परत दिले जातील, असे रिझर्व्ह बँकेकडून उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना सांगण्यात आले. 

उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेची दिवाळखोरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रशासक नेमणार

महाराष्ट्रातील कमिशनर फॉर कॉर्पोरेशन अँड रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटी (महाराष्ट्र राज्य सहकारी आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक) या संस्थेला भारतीय रिझर्व्ह बँकेने उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा कारभार आटोपता घेण्याच्या सूचना दिल्या. दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी