RBI Changed Bank Locker rules :नवी दिल्ली : बॅंकेशी संबंधित काही प्रमुख नियमांमध्ये रिझर्व्ह बॅंकेकडून (RBI)बदल करण्यात आले आहेत. यामध्येच बॅंकेतील लॉकर संदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. नियमांमधील या बदलांचा तुमच्यावर परिणाम होणार आहे. कारण अनेक लोक त्यांचे दागिने, मौल्यवान वस्तू बॅंकेतील लॉकरमध्ये (Bank Locker) ठेवत असतात. घरात अशा वस्तू ठेवल्याने चोरी होण्याची भीती असते. रिझर्व्ह बॅंकेने आता बॅंक लॉकरच्या नियमात (Bank Locker new rules) बदल केले असून जर दीर्घकाळ तुम्ही लॉकर न उघडल्यास आता बॅंकच तुमचे लॉकर उघडून पाहणार आहे किंवा तोडणार आहे. (RBI changed the bank locker rules read in Marathi)
अधिक वाचा : या आयुर्वैदिक उपचाराने अॅसिडिटीला करा बाय-बाय
आरबीआयने बदललेल्या नियमाप्रमाणे बॅंकेच्या लॉकरमध्ये आग, चोरी, दरोडा किंवा घरफोडी झाल्यास, आता बँकेची संपूर्ण जबाबदारी असणार आहे. असे झाल्यास बँकेला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रक्कम ग्राहकाला द्यावी लागेल. तर त्याचबरोबर भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये जर बॅंकेतील तुमच्या लॉकरचे नुकसान झाले तर मात्र अशा नुकसानीस बँक जबाबदार नसेल.
बॅंकांना आरबीआयने बॅंकेतील लॉकरसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार जर दीर्घकाळापर्यत एखाद्या ग्राहकाने त्याचे बॅंक लॉकर उघडलेच नाही तर बॅंकेला ते उघडता येणार आहे. शिवाय लॉकरचे भाडे नियमित भरले जात नसल्यासदेखील बॅंक ते लॉकर उघडू शकते. आरबीआयने नियमातील हे बदल विविध घडामोडी, ग्राहकांच्या तक्रारी आणि बॅंक असोसिएशन कडून मिळालेल्या सूचना यांच्या आधारावर केल्या आहेत. नव्या नियमांबाबतच्या सूचना बॅंकांना देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा : तुम्ही सुद्धा ब्रेड खाता? मग हे वाचाच, अन्यथा....
नव्या नियमानुसार बँक लॉकरचे विघटन करण्याचा, लॉकरमधील सामग्री त्याच्या नॉमिनी/कायदेशीर वारसाकडे हस्तांतरण करण्याचा किंवा सामग्रीची पारदर्शक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा अधिकार बॅंकेला असणार आहे. लॉकर-भाडेकरू 7 वर्षांच्या कालावधीसाठी निष्क्रिय राहिल्यास, त्याने लॉकरच न उघडल्यास आणि बॅंक लॉकरचे भाडे नियमित भरल्यास बॅंक लॉकर उघडू शकणार आहे. आरबीआयच्या सूचनांचे पालन करून बॅंकेला लॉकर उघडता येणार आहे.
बॅंक लॉकर उघडण्याच्या परिस्थितीत आरबीआयच्या सूचनेनुसार बॅंक ग्राहकाला पत्राद्वारे नोटीस देईल. शिवाय ईमेल, मोबाईल नंबर याद्वारे अलर्ट करेल. यानंतर ग्राहकाला वाजवी वेळ देत दोनदा नोटीस दिली जाईल.
अधिक वाचा : लहान मुलांसाठी मनुक्याचे असंख्य फायदे
आरबीआयच्या लॉकरसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की लॉकर बँकेच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत उघडले पाहिजे. त्याचबरोबर दोन स्वतंत्र साक्षीदार असले पाहिजेत. शिवाय संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जावे. ग्राहकाचे लॉकर उघडल्यानंतर, तपशीलवार यादीसह सामग्री सीलबंद कव्हरमध्ये, फायरप्रूफ व्हॉल्टमध्ये छेडछाड प्रतिबंधक पद्धतीने संबंधित ग्राहकाने दावा करेपर्यंत ठेवली जाईल. बॅंक लॉकर उघडण्यासाठी बॅंकेला आरबीआयच्या सर्व सूचनांचे पालन करावे लागणार आहे.