नवी दिल्ली: सध्याच्या काळात दररोज बँकांच्या (Banks) नावे बनावट फोन (fake calls) किंवा मेसेज (message) करून फसवणूक (fraud) केल्याचे प्रकार समोर येत आहेत. हे गुन्हेगार (criminals) बँकांचे नाव घेऊन फोन किंवा मेसेज करतात आणि बँक खात्यांशी (bank account) संबंधित गोपनीय माहिती (confidential information) काढून घेऊन फसवणूक करतात. यापासून वाचण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) नियमितपणे सुरक्षा टिप्स (security tips) शेअर (share) करत असते.
नुकताच आरबीआयने मोबाईल क्रमांकांचा वापर करून होत असलेल्या नव्या फसवणुकीबद्दल इशारा दिला होता. या नोटिसनुसार गुन्हेगार बँकांचे नाव घेऊन फोन किंवा मेसेज करतात आणि बँक खात्यांशी संबंधित गोपनीय माहिती काढून घेऊन फसवणूक करतात. आरबीआयने सांगितले होते की फसवणूक करणारे बँका किंवा आर्थिक संस्थांच्या टोल फ्री क्रमांकाशी साधर्म्य असणाऱ्या मोबाईल क्रमांकांवरून फसवणूक केली जात आहे. या क्रमांकांसोबतच ट्रूकॉलरसारख्या अॅप्सवर या संस्था किंवा बँकांच्या नावानेच ते आपले नंबर सेव्ह करतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा नवा इशारा दिला आहे. आपल्या ट्विटर हँडलद्वारे त्यांनी सांगितले आहे की ग्राहकांनी आपला पिन क्रमांक, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधित कुठलीही माहिती कोणालाही देऊ नये. त्यांनी असेही सांगितले आहे की एखाद्या ग्राहकाचे कार्ड चोरीला गेले किंवा हरवले तर ते तात्काळ ब्लॉक करा. याशिवाय जर कुणी आपल्याकडे आपल्या केवायसीशी संबंधित माहिती मागितली तर सावध व्हा आणि ही माहिती देऊ नका.
काही दिवसांपूर्वीही दिलेल्या इशाऱ्यात आरबीआयने म्हटले होते की बँकांकडून येणाऱ्या फोनचा नंबर 1600-123-1234 आहे असे आपण समजू. तर हे गुन्हेगार 600-123-1234 अशा किंवा यासारख्या नंबरवरून फोन करतात आणि ट्रूकॉलर किंवा यासारख्या सेवा देणाऱ्या अॅपवर आपले नाव बँकेच्या टोल फ्री क्रमांकाच्या नावे रजिस्टर करतात. त्यामुळे लोकांना हे कळत नाही की फोन बँकेचा आहे की एखाद्या फसवणूक करणाऱ्याचा.
आरबीआयने म्हटले आहे की कोणतीही आर्थिक संस्था किंवा त्यांचे प्रतिनधी ईमेल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅप संदेश पाठवत नाहीत आणि व्यक्तिगत माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी विचारण्यासाठी फोनवर कॉल करत नाहीत हे समजून घेणे महत्वाचे आहे. अशा मेसेज किंवा फोनला प्रतिसाद देऊ नका. कोणत्याही व्हेरिफिकेशनसाठी मेसेजवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. आपल्या बँकशी संपर्क करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि सुरक्षित मार्गाने आपल्या समस्या मांडा.