RBI गव्हर्नर शक्तिकांत दासांना कोरोना

RBI Governor Shaktikanta Das Tests Positive For Coronavirus भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली.

RBI Governor Shaktikanta Das Tests Positive For Coronavirus
RBI गव्हर्नर शक्तिकांत दासांना कोरोना 

थोडं पण कामाचं

  • RBI गव्हर्नर शक्तिकांत दासांना कोरोना
  • क्वारंटाइन होऊन काम करत आहेत आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत गव्हर्नर
  • भारतात ६ लाख ५६ हजार २६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India - RBI) गव्हर्नर (Governor) शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना कोरोनाची (corona virus) लागण झाली. दास यांनी ट्वीट (tweet) करुन ही माहिती दिली. ते क्वारंटाइन (quarantine / isolate) होऊन काम करत आहेत.

माझी कोरोना चाचणी (corona test) पॉझिटिव्ह (positive) आली. कोणतेही लक्षण दिसलेले नाही, प्रकृती स्थिर आहे. मी क्वारंटाइन होऊन काम करत आहेत. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे ट्वीट शक्तिकांत दास यांनी केले. 

रिझर्व्ह बँकेतील सर्व कामकाज सामान्य पद्धतीने सुरळीत सुरू राहणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स आणि मोबाइलच्या माध्यमातून गव्हर्नर शक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. कामकाजात अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

भारतात आतापर्यंत ७९ लाख ९ हजार ४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १ लाख १९ हजार ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाबाधितांपैकी ७१ लाख ३३ हजार ९९३ जण कोरोनामुक्त झाले. अद्याप ६ लाख ५६ हजार २६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. भारताचा कोरोना रिकव्हरी रेट (कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण / recovery rate) ९० टक्के तर कोरोना डेथ रेट (मृत्यू दर / death rate) १.५१ टक्के आहे. 

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे पतधोरण (Monetary Policy) ९ ऑक्टोबरला जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीसाठी रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या तिमाहीसाठी रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के राहतील असे जाहीर केले. आधीच्या तिमाहीतही हेच दर होते त्यामुळे अर्थव्यवस्थेत स्थैर्य येत असल्याचा स्पष्ट संदेश सर्वत्र पोहोचला. 

कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेत घसरण झाली. या घसरणीतून अर्थव्यवस्था सावरत आहे. चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येत असल्याचे स्पष्ट दिसू लागेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. बँकांच्या पतपुरवठ्यात ९ ऑक्टोबरपर्यंत ५.५६ टक्के वाढ झाली. यामुळे बँकांचा पतपुरवठा १०३.४४ लाख कोटी रूपये एवढा झाला. बँकांच्या ठेवीत १०.५५ टक्क्यांची वाढ झाली. या वाढीमुळे बँकांतील ठेवींच्या स्वरुपात असलेली एकूण रक्कम १४३.०२ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त झाली, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली.

सध्या भारतामध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या लशींसाठी प्रयोग सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी भारतीय लस २०२१च्या पहिल्या तिमाहीत तयार होण्याची शक्यता आहे. भारत बायोटेक आणि सीरमसह देशातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस करण्याकरिता संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. ताज्या अहवालानुसार सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांचे प्रयोग यशस्वी झाल्यास या दोन्ही कंपन्या २०२१च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी