ऑनलाइन पेमेंट दिरंगाईप्रकरणी ५.७८ कोटींचा दंड

RBI imposes over Rs 5.78 crore fine on six entities ऑनलाइन पेमेंट प्रकरणी अवास्तव दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँकेने सहा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली.

RBI imposes over Rs 5.78 crore fine on six entities
ऑनलाइन पेमेंट दिरंगाईप्रकरणी ५.७८ कोटींचा दंड 

थोडं पण कामाचं

  • ऑनलाइन पेमेंट दिरंगाईप्रकरणी ५.७८ कोटींचा दंड
  • रिझर्व्ह बँकेची ६ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई
  • पंजाब नॅशनल बँक, सोडेक्सो, फोन पे वर कारवाई

नवी दिल्ली: ऑनलाइन पेमेंट प्रकरणी अवास्तव दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) सहा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून रिझर्व्ह बँकेने ५.७८ कोटींचा दंड वसूल केला. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank - PNB), सोडेक्सो एसव्हीसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Sodexo), मुत्थूट व्हेईकल अँड असेट फायनान्स लिमिटेड (Muthoot Vehicle & Asset Finance Ltd), क्विकसिल्व्हर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Qwikcilver Solutions Pvt. Ltd.), फोन पे प्रायव्हेट लिमिटेड (PhonePe) आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Delhi Metro Rail Corporation - DMRC) या सहा अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. (RBI imposes over Rs 5.78 crore fine on six entities including PNB, Sodexo, PhonePe)

रिझर्व्ह बँकेने द पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम अॅक्ट २००७ अंतर्गत (The Payment and Settlement Systems Act, 2007) दंडात्मक कारवाई केली. दंडात्मक कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये पंजाब नॅशनल बँक ही एकमेव बँक आहे. बाकीच्या पाच या बँक श्रेणीत नसलेल्या पण आर्थिक सेवा देणाऱ्या संस्था आहेत. या पाच संस्थांचा रिझर्व्ह बँकेने नॉन बँकिंग प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट्स (Non Banking Prepaid Payment Instruments) या गटात समावेश केला आहे.

ऑनलाइन व्यवहारात अडचण आली, व्यवहार पूर्ण झाला नाही तर तक्रार येते. या तक्रारीची दखल घेऊन पैसे योग्य त्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. तक्रार आल्यापासून निश्चित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेकडे आहे. या अधिकाराचा वापर करुन अनेक प्रकरणांचा एकत्रित विचार करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार वेगाने, अचूक आणि सहज व्हावे ही रिझर्व्ह बँकेची मुख्य अपेक्षा आहे. या हेतूला हरताळ फासणारा प्रकार घडल्यामुळे रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली.

सोडेक्सोला सर्वाधिक दोन कोटी रुपयांचा दंड करण्यात आला. पंजाब नॅशनल बँक आणि क्विकसिल्व्हर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड करण्यात आला. फोन पे प्रायव्हेट लिमिटेडला १ कोटी २९ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. मुत्थूट व्हेईकल अँड असेट फायनान्स लिमिटेडला ३४.५५ लाख रुपयांचा तर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला पाच लाख रुपयांचा दंड करण्यात आला.

  1. ऑनलाइन पेमेंट दिरंगाईप्रकरणी रिझर्व्ह बँकेची ६ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई
  2. सोडेक्सोला सर्वाधिक दोन कोटी रुपयांचा दंड तर पंजाब नॅशनल बँक आणि क्विकसिल्व्हर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड
  3. फोन पे प्रायव्हेट लिमिटेडला १ कोटी २९ लाख रुपयांचा दंड
  4. मुत्थूट व्हेईकल अँड असेट फायनान्स लिमिटेडला ३४.५५ लाख रुपयांचा दंड
  5. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला पाच लाख रुपयांचा दंड

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी