आरबीआयकडून दरकपातीचे संकेत, आजपासून द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक

काम-धंदा
Updated Dec 02, 2019 | 11:56 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

आरबीआयच्या आजपासून सुरू होणाऱ्या द्वैमासिक पतधोरण बैठकीवर बॅंकिंग तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. तज्ज्ञांच्या मते बैठकीत रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे.

RBI
आरबीआयकडून दरकपातीचे संकेत, आजपासून द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक  |  फोटो सौजन्य: Google Play

थोडं पण कामाचं

  • आरबीआयची द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक आज (२ डिसेंबर)पासून सुरू होणार आहे.
  • या बैठकीतील निर्णय हे ५ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.
  • बॅकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या मते या पतधोरण बैठकीत रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे.

आरबीआयची द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक आज (२ डिसेंबर)पासून सुरू होणार आहे. या बैठकीतील निर्णय हे ५ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. बॅकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या मते या पतधोरण बैठकीत रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे. रेपो दरात कपात झाल्यास आरबीआयकडून करण्यात आलेली ही सहावी कपात ठरणार आहे.

गेल्या वर्षभरात देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. दरम्यान आरबीआयच्या फेब्रुवारी ते ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पाच बैठकींमध्ये पाच वेळा रेपो दरात कपात करण्यात आली. म्हणजेच रेपो दरात एकूण १.३५ टक्के इतकी कपात या काळात झाली. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे निदर्शक असणाऱ्या आकडेवारीमध्ये सातत्याने घट होत असल्याचे आढळून आले आहे. आरबीआयकडून इतक्या मोठ्या प्रमाणात व्याजदरांत कपात करण्यात आली असूनदेखील अर्थव्यवस्थेची गाडी काही रूळावर येताना दिसत नाही आहे. परिणामी आरबीआयवर पुन्हा दरकपात करण्यासाठी दबाव असल्याचे चित्र सध्या आहे.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबरच्या अखेरच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी वृद्धीचा दर साडेचार टक्के एवढा होता. गेल्या ६ वर्षांतील ही सर्वात निचांकी आकडेवारी आहे. पहिल्या तिमाहीअखेर हा दर पाच टक्क्यांवर होता. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार दिसऱ्या तिमाहीत विकासदर ५.३ टक्क्यांवर असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गेल्या ६ महिन्यांत विकासदर ६.६ ते ७.२ टक्क्यांवर राहील असेही त्यावेळी नमूद करण्यात आले होते. मात्र सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घट नोंदविण्यात आली. २०१२-१३ नंतर आता नोंदविण्यात आलेला हा सर्वात निचांकी दर आहे.

सध्या आरबीआयच्या माध्यमातून उद्योगजगताला स्वस्त दरात कर्जे मिळण्यासाठी रेपो दरात कपात करण्याची मागणी होत असून सरकार गृहबांधणी क्षेत्राला वर आणण्यासाठी या क्षेत्रात गुंतवणूक करत आहे. त्यामुळेच आजपासून सुरू होणाऱ्या द्वैमासिक पतधोरण समिती बैठकीत आरबीआयवर दुहेरी दबाव असण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी