रिझर्व्ह बॅंकेचे नवे नियम, मोबाईल वॉलेटद्वारे एटीएममधून काढता येईल कॅश

काम-धंदा
Updated Apr 11, 2021 | 18:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cash Withdrawal from Mobile Wallet at ATM:रिझर्व्ह बॅंकेने आता मोबाईल वॉलेट (Mobile Wallet)सारख्या प्रीपेड सुविधांद्वारे कॅश काढण्याची आणि मर्चेंट पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. मोबाईल वॉलेटद्वारे एटीएममधून

RBI allows cash withdrawal from ATM through mobile wallet
मोबाईल वॉलेटद्वारे एटीएममधून काढता येणार कॅश 

थोडं पण कामाचं

  • मोबाईल वॉलेट (Mobile Wallet)सारख्या प्रीपेड सुविधांद्वारे एटीएममधून कॅश काढता येणार
  • ताज्या पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेचा एक मोठा निर्णय
  • इंटरऑपरेबिलिटीची सुविधा तीन टप्प्यांत पूर्ण होणार

नवी दिल्ली: ताज्या पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयानुसार आता मोबाईल वॉलेटसारख्या (Mobile Wallet) प्रीपेड सुविधांद्वारे एटीएममधून (ATM) कॅश काढता येणार आहे. (Cash Withdrawal from Mobile Wallet at ATM)शिवाय मर्चेंट पेमेंटदेखील करता येणार आहे. याशिवाय रिझर्व्ह बॅंकेने पेमेंट्स बॅंकांद्वारे म्हणजेच गुगल पे, पेटीएम, फोन पे सारख्या सुविधांद्वारे सेंट्रलाईझ्ड पेमेंट सिस्टम म्हणजेच आरटीजीएस (RTGS)आणि एनईएफटी (NEFT)या सुविधांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या नव्या निर्णयांमुळे आता मोबाईल वॉलेट, बॅंकांच्या पातळीवर आल्या आहेत. अर्थात प्रीपेड इंस्ट्रूमेंट सेवांचे कोणतेही खाते नसते किंवा त्यांच्याकडून कोणतीही एटीएम सेवादेखील पुरवली जात नाही. मोबाईल वॉलेटद्वारे एटीएममधून पैसे कसे काढायचे किंवा मर्टेंट पेमेंट कसे करायचे? ते समजून घेऊया.

मोबाईल वॉलेटद्वारे एटीएममधून पैसे कसे काढायचे?


पेवर्ल्ड मनी (Payworld Money)चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण धाभाई म्हणतात की वॉलेट कंपन्या आपल्या ग्राहकांना प्रीपेड कार्ड देतील. पेवर्ल्ड मनी ही एक पेमेंट कंपनी आहे, शिवाय त्यांचे मोबाईल वॉलेटसुद्धा आहे. प्रवीण धाभाई पुढे सांगतात, या प्रीपेड कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढता येतील. या कार्डद्वारे स्टोअर किंवा दुकानांमध्ये पेमेंट करता येईल. हे कार्ड स्वाईप करून हे पेमेंट करता येणार आहे.

सर्वच प्रीपेड इंन्स्ट्रूमेंटद्वारे करता येणार मनी ट्रान्सफर


ऑक्टोबर २०१८ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने मोबाईल वॉलेटच्या इंटरऑपरेबिलिटीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोबाईल वॉलेटना युपीआयद्वारे रुपे आणि व्हिजा यासारख्या प्लॅटफॉर्मवर पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले होते. आतापर्यत ही सुविधा पर्यायी स्वरुपात होती. त्यामुळे थोड्याच मोबाईल वॉलेटने ही सुविधा सुरू केली होती. पण आता मात्र आपल्या द्वैमासिक पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने सर्वच प्रीपेड इंस्ट्रूमेंटना ही सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे.

तीन टप्प्यांत होणार सुविधा उपलब्ध


रिझर्व्ह बॅंकेच्या अधिसूचनेनुसार इंटरऑपरेबिलिटीची सुविधा तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व वॉलेटना युपीआयशी जोडून घ्यावे लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वॉलेटना आपल्या ग्राहकांना युपीआयचा वापर करून कोणत्याही बॅंक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात प्रीपेड इंस्ट्रूमेंटना कार्ड बाजारात आणता येईल. काही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना कार्ड देण्याची सुरूवातदेखील केली आहे. प्रवीण धाभाई सांगतात की सद्य परिस्थितीत वॉलेटद्वारे पेमेंट करण्याची सिस्टम वापरू शकत नाहीत. कारण बहुतांश ग्राहकांनी आपले मोबाईल वॉलेट आधार कार्डशी लिंक केलेले नाहीत.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ताज्या पतधोरणात नॉन बॅंक पेमेंट सिस्टम ऑपरेटर्सना आरटीजीएस आणि एनईएफटी या सुविधा जोडण्याची परवानगी दिली आहे. याआधी ही सुविधा फक्त बॅंकांपुरतीच मर्यादित होती. आररटीजीएस आणि एनईएफटी सुविधा आरबीआयच्या अखत्यारित येतात. यामुळे आता युपीआयचे व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. आपल्या पहिल्याच द्वैमासिक पतधोरण बैठकीत आरबीआयने हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. डिजिटल बॅंकिंगसंदर्भात आणखी एक महत्त्वाचे पाऊल रिझर्व्ह बॅंकेने उचलेले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी