नोकरदारांसाठी खुशखबर! ऑगस्टपासून बॅंक हॉलिडे आणि रविवारीदेखील जमा होणार तुमचा पगार, आरबीआयचा मोठा निर्णय

शक्तिकांता दास यांनी आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे.आता रविवार आणि बॅंक हॉलिडेसारख्या सुट्टीच्या दिवशीदेखील नोकरदारांचे पगार जमा होणार आहेत.

RBI's big announcement
रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही जमा होणार पगार, आरबीआयची घोषणा 
थोडं पण कामाचं
  • पतधोरण समितीच्या बैठकीत आरबीआयचा मोठा निर्णय
  • १ ऑगस्टपासून रविवारी आणि बॅंक हॉलिडेसारख्या सुट्टीच्या दिवशीदेखील नोकरदारांचे पगार जमा होणार
  • व्याजदरात बदल नाही

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) महत्त्वाची घोषणा केली आहे. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस  सिस्टम (National Automated Clearing House) (NACH) सर्व दिवस उपलब्ध राहणार असल्याची घोषणा केली आहे. १ ऑगस्टपासून रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही सिस्टम कार्यरत राहणार आहे. शक्तिकांता दास (RBI governor, Shaktikanta Das) यांनी आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे नोकरदारांना (Salaried class)मोठा दिलासा मिळणार आहे. आता रविवार आणि बॅंक हॉलिडेसारख्या सुट्टीच्या दिवशीदेखील (Sunday & bank holidays) नोकरदारांचे पगार जमा होणार आहेत.  १ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे डिव्हिडंड, व्याजदर, वेतन, पेन्शन, विजबिले, गॅस बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, कर्जासाठीचे हफ्ते, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, विम्याचे हफ्ते इत्यादी सर्व बाबींची पूर्तता आता रविवारी, बॅंक हॉलिडे आणि इतर सुट्टयांच्या दिवशीदेखील करता येणार आहे. (RBI monetary policy : From 1st f August your salary will be credited even on Sundays & bank holidays, RBI's big announcement)

रिझर्व्ह बॅंकेचा महत्त्वाचा निर्णय

रिझर्व्ह बॅंकेने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्राहकांना किंवा खातेधारकांनी ऑटो डेबिटची सुविधा ऑन केल्यानंतरही बॅंक हॉलिडे, सरकारी सुट्टया आणि रविवार या दिवशी ऑटो डेबिटची सुविधा अंमलात येत नव्हती. त्यामुळे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी नोकरदारांचे पगार जमा होत नव्हते. नव्या नियमानुसार रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीदेखील ऑटो डेबिट सुविधा कार्यरत राहणार आहे. त्यामुळे खातेधारकांना यापुढे ज्या दिवशी ऑटो डेबिट होणार आहे तो दिवस रविवार किंवा सुट्टीचा असला तरीदेखील खात्यात बॅलन्स राखावा लागणार आहे. अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल. याआधी ज्या दिवशी तुमच्या खात्यातून ऑटो डेबिटद्वारे रक्कम कापली जाणार होती तो दिवस जर रविवार किंवा सुट्टीचा असला आणि खात्यात आवश्यक बॅलन्स नसला तर दंड आकारला जात नव्हता. दुसऱ्या दिवशी खात्यात पुरेशी रक्कम जमा करण्याची सुविधा होती. आता मात्र रविवार असो की सुट्टीचा दिवस ऑटो डेबिटद्वारे त्याच दिवशी पैसे कापले जातील.

आरटीजीएस आणि एनईएफटी याआधीच २४ तास उपलब्ध

एनएसीएच ही एक बल्क पेमेंट म्हणजे मोठ्या रकमेचे पेमेंट करण्यासाठीची यंत्रणा आहे. अनेक व्यक्तींच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा करण्यासाठीची ही लोकप्रिय आणि डिजिटल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यंत्रणा आहे. या यंत्रणेमुळे कोरोनाच्या संकटकाळात सरकारला नागरिकांच्या खात्यात वेळेवर आणि पारदर्शकरित्या पैसे जमा करता येत आहेत, असे आरबीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एनएसीएच सिस्टम सध्या ज्या दिवशी बॅंका कार्यरत आहेत त्याच दिवशी उपलब्ध असते. मात्र ग्राहकांना सुविधा पुरवण्यासाठी आणि आरटीजीएस सुविधा वर्षातील सर्व दिवस उपलब्ध झाल्याचा फायदा घेण्यासाठी एनएसीएच सिस्टम देखील आठवड्याचे सर्वच दिवस आणि सर्व वर्षभर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२१ पासून उपलब्ध होणार आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. याआधी आरबीआयने एनईएफटी आणि आरटीजीएस या इलेक्ट्ऱॉनिक पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या सुविधा २४ तास उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल कार्यपद्धतीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने ही पावले उचलली आहेत. 

पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी रेपो रेट न बदलण्याचा निर्णय जाहीर केला. आरबीआयने रेपो रेट ४ टक्क्यांवरच कायम ठेवला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटदेखील न बदलता ३.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी