RBI कडून 'या' बॅंकेवर मोठी कारवाई, खातेधारकांना काढता येणार नाही ५,००० पेक्षा जास्त रक्कम

Reserve Bank of India | यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेच्या ग्राहकांना किंवा खातेधारकांना त्यामुळे ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. या सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने रिझर्व्ह बॅंकेने हे पाऊल उचलले आहे.

RBI
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध
  • बॅंकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने केली कारवाई
  • खातेधारकांना ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यास मनाई

RBI | नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) महाराष्ट्रातील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेवर (Babaji Date Mahila Sahakari Bank) निर्बंध घातले आहेत. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेच्या ग्राहकांना किंवा खातेधारकांना त्यामुळे ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. या सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने रिझर्व्ह बॅंकेने (RBI restrictions on Babaji Date Mahila Sahakari Bank)  हे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की बॅंकिंग अधिनियम १९४९ अंतर्गत ८ नोव्हेंबर २०२१ला बॅंकेचे कामकाज बंद झाल्यापासून सहा महिन्यांपर्यत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या निर्बंधांवर अधिक अभ्यास केला जातो आहे. (RBI imposed restrictions on Babaji Date Mahila Sahakari Bank of Yavatmal)

आरबीआयच्या परवानगीशिवाय बॅंकेला व्यवहार करण्यास मनाई

यवतमाळच्या या सहकारी बॅंकेला आता रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीशिवाय व्यवहार करता येणार नाही. कोणतेही कर्ज वितरण किंवा रोख रक्कम यासंदर्भाती व्यवहार बॅंकेला करता येणार नाहीत. याशिवाय रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगी शिवाय बॅंक कोणतीही देणी देऊ शकणार नाही, कोणत्याही वित्तीय व्यवहारात बॅंकेला सहभागी होता येणार नाही. बॅंकेला आपली संपत्ती विकता येणार नाही किंवा स्थानांतरितदेखील करता येणार नाही. बॅंकेची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बॅंकेने चालू खाते किंवा इतर खातेधारकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेधारकांना ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेतून काढता येणार नाही.

आणखी एका बॅंकेवरील निर्बंध ७ फेब्रुवारी २०२२ पर्यत वाढले

दरम्यान रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने कर्नाटकातील दावणगिरीस्थित मिलथ को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. (Millath Co-operative Bank Limited)वर लावलेले निर्बंध आणखी तीन महिन्यांपर्यत म्हणजे ७ फेब्रुवारी २०२२ पर्यत वाढवले आहेत. कर्नाटकातील या सहकारी बॅंकेवर २६ एप्रिल २०१९ला निर्बंध लावण्यात आले होते. त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. मागील वेळेस निर्बंधांना ७ नोव्हेंबरपर्यत वाढवण्यात आले होते.

पीएमसी बॅंक प्रकरण

आर्थिक संकटात सापडलेल्या पंजाब अॅंड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या (Punjab & Maharashtra Co-Operative Bank- PMC Bank)ग्राहकांना पहिल्या लॉटमध्ये ५ लाख रुपयांपर्यत विमा संरक्षण मिळणार नाही. बॅंक सध्या मल्टी-स्टेट-को ऑपरेटिव्ह बॅंक रेझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत आहे. डिपॉझिट इन्श्युरन्स अॅंड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) पहिल्या लॉटमध्ये पीएमसी बॅंकेव्यतिरिक्त २० इतर संकटात असलेल्या बॅंकेच्या ग्राहकांना पैसे देणार आहे. पहिल्या लॉटसाठी ९० दिवसांचा कालावधी ३० नोव्हेंबरला संपणार आहे.

मागील काही वर्षात आरबीआयने आर्थिकदृष्ट्या संकटात असणाऱ्या बॅंकांच्या खातेधारकांचे हित लक्षात घेऊन अनेक बॅंकांवर निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत आरबीआय संबंधित बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती करते. त्यानंतर बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा पडताळा घेतला जातो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी