'आरबीआय'ने बदलले सॅलरी, पेन्शन, ईएमआयचे नियम, १ ऑगस्टपासून होणार लागू

RBI update: रिझर्व बॅंकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसचे (NACH)नियम बदलले आहेत. हे बदल १ ऑगस्ट २०२१पासून लागू होणार आहेत. आता ग्राहकांना आता रविवारीदेखील त्यांच्या बॅंक खात्यात पेन्शन किंवा वेतन मिळणार आहे.

change in rules for NACH system
एनएसीएच सिस्टमच्या नियमात बदल 

थोडं पण कामाचं

  • नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसच्या बदललेले नियम १ ऑगस्ट २०२१पासून लागू होणार
  • एनएसीएच सुविधा आता सातही दिवस उपलब्ध
  • रविवारीदेखील ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा होणार पेन्शन किंवा वेतन

मुंबई: बॅंक खातेधारकांना आता पेन्शन (Pension), सॅलरी (Salary) आणि ईएमआय भरणे (Payment of EMI) यासाठी बॅंकांच्या कामकाजी दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. कारण आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) यासंदर्भातील नियम बदलले आहेत. रिझर्व बॅंकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसचे (National Automated Clearing House)(NACH)नियम बदलले आहेत. हे बदल १ ऑगस्ट २०२१पासून लागू होणार आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी जून महिन्यातील पतपुरवठा धोरणाचा आढावा बैठकीनंतर यासंदर्भातील घोषणा केली होती. ग्राहकांना आता आरटीजीएस (RTGS) आणि एनएसीएचची सुविधा आठवड्याचे सर्व दिवस २४ तास उपलब्ध राहणार आहे. देशातील बॅंक ग्राहकांना अधिक सुविधा पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Reserve Bank of India changed rules for NACH system, will be effective from 1st August 2021) 

एनएसीएच सुविधा आता सातही दिवस उपलब्ध

एनएसीएच सुविधा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहेत. सध्या ग्राहकांसाठी एनएसीएच सुविधा बॅंकांच्या कामकाजी दिवशी म्हणजेच सोमवार ते शुक्रवार या दिवशीच उपलब्ध असते. एनएसीएच सुविधेत करण्यात आलेल्या बदलानुसार आता बॅंकेच्या ग्राहकांना त्यांचे पेन्शन किंवा वेतन मिळण्यासाठी बॅंकेच्या कामकाजी दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. १ ऑगस्ट २०२१ पासून ग्राहकांना हे सर्व ट्रान्झॅक्शन आठवड्यातील कोणत्याही दिवशी करता येणार आहेत, अगदी शनिवारी आणि रविवारीदेखील हे सर्व काम आता होणार आहे.

आता पगार, पेन्शन मिळणार रविवारीदेखील

एनएसीएच सेवांमधील हे बदल ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा पुरवण्यासाठी करण्यात आले आहेत. विशेषत: महिन्याचा पहिला दिवस जर शनिवार किंवा रविवार किंवा बॅंकेच्या सुट्टीचा दिवस असेल तर आता या बदलामुळे ग्राहकांची अडचण होणार नाही. सर्वसाधारणपणे ग्राहकांना पगाराच्या दिवशी जर बॅंक रविवार असेल तर पगार आपल्या बॅंक खात्यात जमा होण्यासाठी पुढील दिवसापर्यत वाट पाहावी लागायची. मात्र एनएसीएच सेवांमधील हे बदल १ ऑगस्टपासून लागू झाल्यानंतर ग्राहकांना आता रविवारीदेखील त्यांच्या बॅंक खात्यात पेन्शन किंवा वेतन मिळू शकणार आहे.

एनएसीएच काय आहे?

एनएसीएच म्हणजे नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसचे (National Automated Clearing House) (NACH)हा एक बल्क पेमेंट सिस्टम आहे. या सेवेचे संचालन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)कडून केले जाते. ही व्यवस्था अनेक प्रकारच्या क्रेडिट ट्रान्सफरसाठी म्हणजेच व्याज देणे, लाभांश देणे, पेन्शन आणि वेतन ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा करणे यासाठी वापरली जाते. एनएसीएचद्वारे ग्राहक विविध बिले, कर्जाचे ईएमआय, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि विमा पॉलिसीचे प्रिमियम यांचाही भरणा करू शकतात. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार एनएसीएच ही ग्राहकांमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर सुविधेसाठी लोकप्रिय झाली आहे. एनएसीएचद्वारे डिजिटल पद्धतीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करता येते. कोरोना महामारीच्या काळात विविध लाभार्थ्यांना वेळेवर आणि पारदर्शकपणे सब्सिडी पुरवण्यासाठी सरकारला या सिस्टमचा मोठा उपयोग झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी