Repo Rate Hike by RBI : नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या आणि महागाईला आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo Rate Hike) 0.50% वाढ केली आहे. त्यामुळे आता रेपो दर 4.40% वरून 4.90% झाला आहे. त्यामुळे आता गृह कर्जापासून ते वाहन आणि वैयक्तिक कर्जापर्यंत(Loan) सर्व काही महाग होणार आहे आणि तुम्हाला जास्त ईएमआय (EMI) भरावा लागेल. व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी 6 जूनपासून आरबीआयच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) बैठक सुरू होती. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das)यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली होती. अर्थात व्याजदरात वाढ झाल्यामुळे बॅंकेतील मुदतठेवीवरील व्याजदरातदेखील वाढ होणार आहे. तुमच्या ईएमआयवर किती आणि कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया. (RBI rises repo rate, loan will become costlier, check the impact on your EMI)
रेपो रेट हा तो व्याजदर असतो ज्यावर बँकांना रिझर्व्ह बॅंकेकडून (RBI)कर्ज मिळते, तर रिव्हर्स रेपो रेट हा तो व्याजदर असतो ज्यावर आरबीआय बँकांना पैसे ठेवण्यावर व्याज देते. जेव्हा आरबीआय रेपो दर कमी करते, तेव्हा बँका देखील बहुतेक वेळा व्याजदर कमी करतात. म्हणजेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी होतात, त्याचप्रमाणे ईएमआयही कमी होतो. त्याचप्रमाणे, जेव्हा रेपो दरात वाढ होते, तेव्हा व्याजदरात वाढ होते आणि परिणामी ग्राहकांसाठी कर्ज महाग होते. कारण व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडून जास्त व्याजदरावर पैसे मिळतात, ज्यामुळे बॅंकांना व्याजदर वाढवणे भाग पडते.
समजा अजय नावाच्या व्यक्तीने 6.5% व्याजदराने 20 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. त्याच्या कर्जाचा ईएमआय 7,456 रुपये आहे. 20 वर्षात त्याला या दराने 7,89,376 रुपये व्याज द्यावे लागेल. म्हणजेच त्याला 10 लाखांच्या मुद्दलावर व्याजासह एकूण 17,89,376 रुपये द्यावे लागतील.
अजयचे कर्ज घेतल्यानंतर एका महिन्यानंतर, RBI ने रेपो दरात 0.50% वाढ केली. यामुळे बँकांच्या व्याजदरात 0.50% वाढ होते. आता जेव्हा अजयचा मित्र जेव्हा त्याच बँकेत कर्ज घेण्यासाठी पोहोचतो तेव्हा बँक त्याला 6.5% ऐवजी 7% व्याजदराने कर्ज देते.
अजयचा मित्र सुद्धा 10 लाख रुपये फक्त 20 वर्षांसाठी कर्ज घेतो, पण त्याचा ईएमआय 7753 रुपये होतो. म्हणजेच अजयच्या ईएमआयपेक्षा 297 रुपये जास्त असतो. यामुळे अजयच्या मित्राला 20 वर्षात एकूण 18,60,717 रुपये द्यावे लागतील. ही रक्कम अजयच्या रकमेपेक्षा 71 हजार जास्त आहे.
टीप: हे कॅल्क्युलेशन SBI होम लोन EMI कॅल्क्युलेटरवर आधारित आहे.
गृहकर्जाचे व्याजदर 2 प्रकारचे आहेत. पहिला फ्लोटर आणि दुसरा फ्लेक्झिबल म्हणजे बदलता व्याजदर. फ्लोटरमध्ये, तुमच्या कर्जाचा व्याजदर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखाच राहतो, रेपो दरात बदल झाला तरीही. दुसरीकडे, लवचिक व्याजदर घेऊन कर्ज घेतलेले असल्यास रेपो दरात बदल केल्यास तुमच्या कर्जाच्या व्याजदरातही फरक पडेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आधीच लवचिक व्याजदराने कर्ज घेतले असेल, तर तुमच्या कर्जाचा ईएमआय देखील वाढेल.
समजा तुम्ही 6.50% लवचिक व्याजदराने 20 वर्षांसाठी 10 लाखांचे कर्ज घेतले आहे. यानुसार, पूर्वी तुमचा ईएमआय 7,456 रुपये होता. तो 7% व्याजदरानंतर 7,753 रुपये होईल. याशिवाय, 6.50% व्याजदरानुसार, पूर्वी तुम्हाला एकूण 17.89 लाख रुपये द्यावे लागायचे. ही रक्कमही वाढणार आहे. मात्र ती किती वाढेल हे तुम्ही आतापर्यंत फेडलेल्या कर्जावर आणि कालावधीवर अवलंबून असेल.
ब्लूमबर्गने सर्वेक्षण केलेल्या 41 पैकी 17 अर्थशास्त्रज्ञांनी रेपो दर 0.50% ते 4.9% ने वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला होता. काही अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आरबीआय हळूहळू रेपो दर 5.15% वर म्हणजे कोरोनाआधीच्या पातळीपेक्षा वाढवेल. पतधोरण समितीची बैठक दर दोन महिन्यांनी घेतली जाते. परंतु यापूर्वी, आरबीआयने रेपो दर 4% वरून 4.40% पर्यंत वाढवण्यासाठी 2 आणि 3 मे रोजी आपत्कालीन बैठक बोलावली होती. हा बदल 22 मे 2020 नंतर रेपो दरात करण्यात आला. या आर्थिक वर्षाची पहिली बैठक 6-8 एप्रिल रोजी झाली होती.
आरबीआयच्या मागील बैठकीनंतर देशात आणि जगात 4 मोठे बदल झाले आहेत:
1. चीनमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्याने जगभरात कच्चे तेल, पोलाद यांसारख्या कमोडिटीजची मागणी वाढली.
2. आंतरराष्ट्रीय बाजारात, बेंचमार्क क्रूड ब्रेंट प्रति बॅरल 120 डॉलरच्या वर गेला.
3. अमेरिकन बाँडचा परतावा 2019 नंतर प्रथमच 7.5% पर्यंत पोचला. तो 8% पर्यंत जाण्याची भीती आहे.
4. ब्रिटन आणि युरोझोनमधील महागाई 8% च्या 40 वर्षांच्या विक्रमी पातळीच्या वर पोचली आहे. अशा परिस्थितीत जागतिक महागाई वाढण्याची भीती आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलापासून ते धातूच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता असताना आरबीआयच्या पतधोरण समितीची (एमपीसी) बैठक झाली आहे. अशा स्थितीत जगभर महागाई ही मोठी समस्या बनली आहे. मे महिन्यात जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 7.79% पर्यंत वाढली होती. हा 8 वर्षांचा महागाईचा उच्चांक होता.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'आरबीआय पुढील काही बैठकांमध्ये किमान दर वाढवू इच्छित आहे. मी स्वतः माझ्या इतिवृत्तांत सांगितले आहे की मे महिन्यात ऑफ-सायकल बैठकीचे एक कारण हे होते की आम्हाला जूनमध्ये अधिक कठोर कारवाई नको होती. ते म्हणाले होते, 'रेपो दरात थोडी वाढ होईल, पण किती असेल ते सांगता येणार नाही...'
येत्या काही दिवसांत क्रेडिट कार्ड देखील UPI शी लिंक केले जाईल. त्यामुळे व्यवहार करणे अधिक सोपे होईल. आरबीआयने बुधवारी ही घोषणा केली. त्याची सुरुवात रुपे क्रेडिट कार्डने होईल. सध्या, UPI वापरकर्त्यांना फक्त डेबिट कार्ड आणि बचत/चालू खाती जोडून व्यवहार करण्याची सुविधा मिळते. क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्यासाठी NPCI ला यासंबंधित सूचना जारी केल्या जातील.