मुंबईः भारतीय बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (Reserve Bank of India - RBI) ट्विटर हँडल प्रचंड लोकप्रिय आहे. कोणालाही फॉलो न करणाऱ्या आरबीआयचे ट्विटरवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. मागील दोन वर्षात ट्विटरवर रिझर्व्ह बँकेच्या लोकप्रियतेत वाढ झाली. जगातील सर्व शिखर बँकांना मागे टाकत रिझर्व्ह बँक ट्विटरवर नंबर वन शिखर बँक झाली. (RBI Twitter account reaches one million followers)
इंग्रजांच्या काळात स्थापन झालेल्या भारताच्या शिखर बँकेला ८५ वर्ष झाली. एवढ्या जुन्या असलेल्या रिझर्व्ह बँकेने ट्विटरवर कमालीच्या वेगाने लोकप्रियता मिळवली. रिझर्व्ह बँकेने २०१२ मध्ये ट्विटर हँडल सुरू केले. या हँडलच्या मार्च २०१९ मधील फॉलोअरची संख्या ३ लाख ४२ हजारांच्या घरात होती. फॉलोअरची ही संख्या मार्च २०२० पर्यंत ७ लाख ५० हजारांच्या घरात पोहोचली. लोकप्रियता आणखी वाढली आणि रविवारी २२ नोव्हेंबरपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हँडलने १० लाख फॉलोअरचा टप्पा पार केला.
आयकर, कर्जाचा हप्ता आणि बचत किंवा गुंतवणुकीतून खर्चाला मिळणारे पैसे एवढा माफक विचार करणाऱ्या बहुसंख्य भारतीयांना अर्थव्यवस्था, रिझर्व्ह बँकेचा कारभार असे प्रश्न सतावत नाही. जोपर्यंत स्वतःचे आर्थिक व्यवहार सुरळीत आहेत, तोपर्यंत देशातील बहुसंख्य नागरिक निवांत असतात. भारताने ७३ स्वातंत्र्य दिन साजरे केले तरी याबाबतीत विशेष फरक पडलेला नाही. पण रिझर्व्ह बँकेची ट्विटरवरील लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.
जन धन खाती तसेच वेगवेगळ्या सरकारी योजनांतून मिळणारे पैसे थेट बँक खात्यात जमा होऊ लागल्यापासून कोट्यवधी सामान्य भारतीयांसाठी बँकांचा कारभार हा जिव्हाळ्याचा विषय झाला. रिझर्व्ह बँक नावाची शिखर बँक आहे आणि ती देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारे अनेक निर्णय घेते हे हळू हळू लोकांना कळू आणि उमजू लागले. नोटाबंदी, लॉकडाऊनच्या काळातले निर्णय या मोठ्या घडामोडींमुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयांकडे गंभीरपणे बघणाऱ्या सामान्यांची संख्या वाढली. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे सूर जुळले तर अर्थव्यवस्थेला गती येईल आणि 'अच्छे दिन' अनुभवता येतील हे समजल्यामुळे सोशल मीडियातील रिझर्व्ह बँकेच्या अॅक्टिव्हिटींवर लक्ष ठेवणाऱ्या नेटकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. ट्विटरवर रिझर्व्ह बँकेचा जनाधार वाढला आणि मर्यादीत अर्थसाक्षर असलेल्या भारताची शिखर बँक ट्विटरवर नंबर वन शिखर बँक झाली.
ट्विटरवर लोकप्रिय असलेल्या शिखर बँकांमध्ये रिझर्व्ह बँक पहिल्या स्थानावर आहे. मेक्सिकोची केंद्रीय बँक दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांचे ७.७४ लाख फॉलोअर आहेत. बँक ऑफ इंडोनेशिया ७.५४ लाख फॉलोअरसह तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह चौथ्या आणि युरोपियन युनियनची ईसीबी पाचव्या स्थानावर आहे. ब्राझिलची शिखर बँक सहाव्या तर बँक ऑफ इंग्लंड सातव्या स्थानावर आहे. कॅनडाची शिखर बँक आठव्या तर पाकिस्तानची स्टेट बँक नवव्या स्थानावर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलिया दहाव्या स्थानावर आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सक्षम शिखर बँक अशी ओळख मिरवणाऱ्या बँक ऑफ जपानचे ट्विटरवर फक्त २८ हजार ९०० फॉलोअर आहेत.