गरज पडल्यास वापरू शकता हा रिटायरमेंट फंड, या कारणांमुळे काढता येतात 'पीएफ'मधून पैसे

काम-धंदा
Updated Apr 18, 2021 | 19:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

पीएफ मधील पैसे काढण्यासाठीच्या नियमानुसार ईपीएफ खाताधारक, नोकरी गेल्यास, होम लोन भरण्यासाठी, घर खरेदीसाठी किंवा घराच्या नूतनीकरणासाठी इत्यादी कारणास्तव पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात.

Reasons for which you can withdraw money from PF account
पीएफमधून पैसे काढण्यासाठीचे नियम 

थोडं पण कामाचं

 • पीएफमधून पैसे काढण्यासाठीचे नियम
 • कोणत्या कारणासाठी किती पैसे काढता येतात
 • ऑनलाईन अर्ज कसा कराल

नवी दिल्ली :  प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund)किंवा पीएफ खाते (PF Account)यांना रिटायरमेंटसाठी सर्वात विश्वसनीय फंड समजले जाते. कर्मचारी भविष्य निधि संघटनेच्या (ईपीएफओ) नियमानुसार, ईपीएफओचे ग्राहक आणि त्यांच्या रिक्रुटरसाठी कर्मचाऱ्याच्या बेसिक पगाराच्या १२ टक्के इतके कॉन्ट्रिब्युशन देणे बंधनकारक आहे. ईपीएफओ आपल्या ग्राहकांना गरज पडल्यास पैसे काढण्याची परवानगी देतो.

पैसे काढण्यासाठीचे नियम


पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमावलीनुसार ईपीएफ खातेधारक नोकरी गेल्यास, होम लोन भरण्यासाठी, घर खरेदीसाठी किंवा घराचे नूतनीकरण इत्यादी कारणांसाठी आपल्या पीएफ खात्यामधून पैसे काढू शकतात. प्रॉव्हिडंट फंडातून (PF)अॅडव्हान्स किंवा पूर्ण किंवा थोडेसे पैसे काढण्यासाठी तुम्हाला पीएफ मधून पैसे काढण्याचे नियम किंवा ज्या कारणास्तव पैसे काढता येतात त्यांनी माहिती असणे गरजेचे आहे. पीएफमधून तुम्ही किती रक्कम काढू शकता हे तुमच्या पीएफ खात्याच्या स्थितीवर अवलंबून आहे.

पुढील कारणांसाठी तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढता येतात

 1. जर तुम्हाला नोकरी करण्यास पाच वर्षे पूर्ण झाली असतील तर काही अटींसह तुम्ही पीएफ खात्यामधून पैसे काढू शकता.
 2. स्वत:च्या किंवा पत्नी, मुले, आई-वडील यांच्या वैद्यकीय खर्चासाठी पीएफमधून पैसे काढता येतात.
 3. तुम्हाला जर घर किंवा जमीन खरेदी करायची असेल तर पीएफमधून ९० टक्के रक्कम काढता येते.
 4. स्वत:च्या  किंवा आपल्या मुलांच्या लग्नासाठी ५० टक्के रक्कम काढता येते.
 5. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी नोकरी गेली असल्यास पीएफमधून ७५ टक्के रक्कम काढता येते. ईपीएफमधील उर्वरित २५ टक्के रक्कम नोकरी गेल्यानंतर दोन महिन्यांनी काढता येऊ शकते.

जर तुम्ही नोकरी करत असताना पाच वर्षांआधीच पीएफमधून पैसे काढत असाल तर त्यावर कर भरावा लागतो. म्हणजेच पीएफ खाते सुरू झाल्यानंतर ५ वर्षांच्या आत काढलेली रक्कम प्राप्तिकरास पात्र ठरते.

कसे काढाल पैसे

पीएफमधून पैसे काढण्यासाठी ईपीएफओ ऑफिसमध्ये चकरा मारण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही ऑनलाईनच अर्ज करू शकता.

 1. सर्वात आधी तुम्ही ईपीएफओच्या वेबसाईट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.
 2. आपला युएएन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका आणि लॉग इन करा
 3. यानंतर Manage वर क्लिक करा आणि आपला केवायसी तपासा.
 4. त्यानंतर Online Services वर  CLAIM (FORM-31, 19 आणि 10C)वर क्लिक करा.
 5. आपला क्लेम फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा.

कोणतीही व्यक्ती नोकरीस लागल्यानंतर त्याच्या कंपनीकडून ईपीएफओ खाते उघडले जाते. त्यानंतर दरमहिन्यास कर्मचारी आणि कंपनी यांच्याकडून त्यात ठराविक रक्कम जमा केली जाते. कर्मचाऱ्याच्या बेसिक वेतनाच्या १२ टक्के इतकी ही रक्कम असते. कंपनीसुद्धा तितकीच रक्कम जमा करते. कर्मचाऱ्याचे बेसिक वेतन वाढत जाते तशी ही रक्कमदेखील वाढत जाते. दर महिन्याला ही कपात करूनच तुमच्या हाती पगार दिला जातो. पीएफ हा निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी असतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना भविष्याची आर्थिक तरतूद करता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी