राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला रिलायन्स, रिलायन्सने 'इतक्या' कोटींची केली मदत

काम-धंदा
Updated Aug 19, 2019 | 14:45 IST

Reliance helps Maharashtra: राज्यात आलेल्या पूरस्थितीनंतर सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीजने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Reliance Industries help maharashtra flood affected people
पूरग्रस्तांच्या मदतीला रिलायन्सचा हात  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला रिलायन्स
  • मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
  • अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला मदत निधीचा चेक
  • बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी सुद्धा पूरग्रस्तांना केली मदत

मुंबई: गेल्या महिन्याभरात राज्यातील विविध भागात अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण या भागांना बसला. या पूरस्थितीत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले, होतं नव्हतं ते सर्व काही गमावलं. अशा परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना सर्वच स्तरातून मदत दिली जात आहे. आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रिजने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनंत अंबानी यांनी या ५ कोटी रुपयांच्या मदतीचा चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला आहे. या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा केली आहे.

यासोबतच बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सुद्धा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपयांचा चेक राज्य सरकारकडे सोपवला आहे. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी दिलेली ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, कोकण, नाशिक या जिल्ह्यांतील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. कोल्हापूर आणि सांगलीतील असंख्य घरे अनेक दिवस पाण्याखाली होती. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या स्थितीत पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी सर्वच स्तरातून मदत करण्यात येत आहे. मराठी कलाकारांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन नागरिकांना मदत करण्यास सुरूवात केली आहे.

यापूर्वी रितेश देशमुख-जेनेलियाने केलीय मदत

राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना यापूर्वी बॉलिवूडची क्यूट जोडी असलेल्या रितेश-जेनेलिया यांनी सुद्धा मदत केली आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मदतीचा चेक सुपूर्द केला होता. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाख रुपयांचा चेक दिला होता.

यापूर्वी राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी ६,००० कोटी रुपायांच्या मदतीची घोषणा केली होती. तसेच राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे या संदर्भात निधीची मागणीही करण्यात आली आहे. राज्य सरकारने सहा हजार कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव प्राथमिक माहितीनुसार पाठवला असून नंतर काळात पूरग्रस्त भागांचे पंचनामे करुन प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

या मदतनिधीपैकीस कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी ४ हजार ७०८ कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव तर कोकण, नाशिक आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी २ हजार १०५ कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव आहे. असा एकूण ६,८१३ कोटी रुपयांची मदत महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...