मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने विकत घेतला मनीष मलहोत्रांच्या MM स्टाइल्सचा ४० टक्के हिस्सा

रिलायन्स ब्रॅंडची भारतीय आणि परदेशी बाजारपेठेत विस्ताराची योजना आहे. मनीष मलहोत्राच्या ब्रॅंडला रिलायन्सबरोबरच्या भागीदारीमुळे जगभरातील फॅशनेबल कपड्यांच्या बाजारपेठेत आघाडीचा ब्रॅंड बनण्यास मदत होणार आहे.

Reliance brands ltd & Manish Malhotra
रिलायन्स ब्रॅंड्स आणि मनीष मलहोत्रा 
थोडं पण कामाचं
  • रिलायन्स इंडस्ट्रीजची मनीष मलहोत्रांच्या कंपनीत गुंतवणूक
  • रिलायन्स ब्रॅंडकडून एमएम स्टाइल्सच्या ४० टक्के हिश्याचे संपादन
  • मनीष मलहोत्राच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत राहणार

मुंबई: मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चीच उपकंपनी असलेल्या रिलायन्स ब्रॅंड्स लि.ने (Reliance brands ltd) बॉलीवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मलहोत्रा (Manish Malhotra) यांच्या MM स्टाइल्समधील ४० टक्के हिस्सा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. लक्झरी कपड्यांच्या बाजारपेठेत रिलायन्स ब्रॅंड्सची ही मोठी गुंतवणूक असणार आहे. रिलायन्सकडून अद्याप या व्यवहाराच्या एकूण स्वरुपासंदर्भात अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. (Reliance brands ltd acquires 40% stake in Manish Malhotra's MM styles)

भारत आणि परदेशात विस्तार

रिलायन्स ब्रॅंडची भारतीय आणि परदेशी बाजारपेठेत विस्ताराची योजना आहे. मनीष मलहोत्राच्या ब्रॅंडला रिलायन्सबरोबरच्या भागीदारीमुळे जगभरातील फॅशनेबल कपड्यांच्या बाजारपेठेत आघाडीचा ब्रॅंड बनण्यास मदत होणार आहे. दोन्ही कंपन्या लाइफस्टाइल बाजारपेठेत विस्तार करतील आणि संयुक्तपणे एक मोठा ब्रॅंड उभारण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. याचबरोबर समारंभ आणि लग्नांच्या कपड्यांच्या बाजारपेठेत ब्रॅंड स्थान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रिलायन्सची जरी भागीदारी असली तरी ब्रॅंडचे नेतृत्व मनीष मलहोत्रा यांच्याकडेच असणार आहे. मनीष मलहोत्राच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत राहणार आहेत. 

फॅशन डिझयनिंगमध्ये मनीष मलहोत्रा लोकप्रिय

मनीष मलहोत्रा यांनी बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटात कॉस्च्युम डिझायनिंगचे काम केले आहे. त्यांचा या क्षेत्रातील प्रवास तीन दशके जुना आहे. या कालावधीत त्यांनी हिंदी सिनेमातील एक सायलिस्ट आणि फॅशन आयकॉन म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सध्या मनीष मलहोत्रा यांचे देशभरात चार मुख्य स्टोअर्स आहेत. याशिवाय त्यांचे दोन शॉप इन शॉप्स आहेत. तर रिलायन्स ब्रॅंड्स लिचा देशभरात मोठा विस्तार आहे. 

रिलायन्स ब्रॅंड्सचा विस्तार

रिलायन्स ब्रॅंड्सच्या धोरणातील बदल यातून दिसतो आहे. १४ वर्ष जगभरातील प्रिमियम आणि लक्झरी वेस्टर्न ब्रॅंड्सच्या बाजारपेठेत काम केल्यानंतर रिलायन्स ब्रॅंड्स आता घरगुती डिझायनर बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. आगामी काळात ही बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. रिलायन्स ब्रॅंड्समध्ये ६० पेक्षा जास्त ब्रॅंड्सचा समावेश आहे. यातील बहुतांश ब्रॅंड आंतरराष्ट्रीय आहेत. यामध्ये भारतात ५९५ स्टोअर आणि ७४४ शॉप इन शॉप्स आहेत. यामध्ये Burberry, Hamleys,Hunkemoller, Iconix, Jimmy Choo यासारखे  असंख्य आघाडीचे ब्रॅंड्स आहेत. 

मनीष मलहोत्रा यांच्या कंपनीत रिलायन्स ब्रॅंडची गुंतवणूक झाल्यामुळे त्यांच्या कंपनीला भारतात आणि परदेशात दोन्ही बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. मलहोत्रा यांची कंपनी महागडे भारतीय कपडे विकते. हे कपडे भारतातील श्रीमंत आणि सुप्रसिद्ध व्यक्ती परिधान करतात. मनीष मलहोत्रा हे बॉलीवूडमधील अत्यंत लोकप्रिय फॅशन डिझायनर आहेत. त्यांच्या फॅशनची नेहमी बॉलीवूडमध्ये चर्चा असते. अनेक नामवंत चित्रपट कलावंत, इतर क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती त्यांच्या फॅशनचे कपडे परिधान करत असतात. मागील काही वर्षांमध्ये फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात मनीष मलहोत्रांची स्वत:ची अशी वेगळी ओळख आणि मोठा ब्रॅंड तयार झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी