Mukesh Ambani Childrens: मुंबई: देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज (29 ऑगस्ट, सोमवारी) पार पडली. या एजीएमकडे संपूर्ण उद्योग जगताचे डोळे लागून राहिले होते. कारण मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे रिलायन्सच्या उत्तराधिकारीची घोषणा करतील असा अंदाज गेल्या काही महिन्यांपासून व्यक्त केला जात होता. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये उत्तराधिकार योजनेची (Reliance Succession Plan) अनेक लोक आतुरतेने वाट पाहत होते. (reliance mukesh ambani made a big announcement know which business isha anant and akash ambani will handle)
अंबानींनी केली 'ही' घोषणा
अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सोमवारी झालेल्या AGM मध्ये त्यांच्या मुलांची त्यांच्या उद्योग-व्यवसायात नेमकी काय भूमिका असेल याबाबतचा संभ्रम अखेर दूर केला. मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) हिची त्यांच्या उद्योग समूहाच्या रिटेल व्यवसायाची लीडर प्रमुख म्हणून ओळख करून दिली. यासोबतच त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचयाकडे ऊर्जा व्यवसाय सोपवण्याची घोषणा करून कंपनीची उत्तराधिकार योजना स्पष्ट केली. मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याला आधीच रिलायन्स ग्रुपच्या टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओचे प्रमुख म्हणून नेमलेलं आहे.
मुकेश अंबानी निवृत्ती घेणार नाहीत
उत्तराधिकार्यांची नावे जरी निश्चित केली असली तरीही मुकेश अंबानी हे तात्का निवृत्त होणार नाहीत. आपण अद्याप निवृत्ती घेणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. यावेळी ते असं म्हणाले की, नेतृत्व पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
65 वर्षीय मुकेश अंबानी यांना एकूण तीन मुले आहेत. ईशा आणि आकाश ही जुळी भावंडे आहेत. ईशा हिचं लग्न पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत झालं आहे. तीन मुलांपैकी फक्त आकाश अंबानीला कंपनीचे कार्यकारी प्रमुख बनवण्यात आले आहे. ईशा आणि अनंत हे दोघेही समूह कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
5G सेवा लवकरच सुरु करणार
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आज झालेल्या AGM मध्ये 5G सेवांसदर्भात मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ पुढील दोन महिन्यात म्हणजे दिवाळीपर्यत जगातील सर्वात मोठी 5G सेवा (Jio 5G) सुरू करणार आहे.
'जिओ 5G हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रगत 5G नेटवर्क असेल. जिओ 5G ची नवीन आवृत्ती आणण्यात येईल. ज्याला स्टँडअलोन 5G म्हणतात, ज्याचे आमच्या 4G नेटवर्कवर शून्य-अवलंबित्व आहे. Jio 5G सेवा ही प्रत्येकाला परवडण्याजोगी असेल.' असं मुकेश अंबानी यांनी यावेळी स्पष्ट केलं.