नवी दिल्ली: नागरिकाच्या खांद्यावरील महागाईचा भार थोडाफार प्रमाणात कमी झाला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी (Government Oil Companies) एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinder Price) नवीन जर जाहीर केले आहेत. 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (Commercial LPG cylinder) 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दरम्यान नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरवर कोणताही दिलासा नाही.
दरम्यान, या दर कपातीनंतर आता दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी एलपीजी सिलिंडर 2,354 रुपयांऐवजी 2,219 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत आता 2,454 रुपयांवरून 2,322 रुपयांवर आली आहे. मुंबईत हे सिंलिडर 2,306 रुपयांऐवजी 2,171.50 रुपयांना मिळेल, तर चेन्नईमधील ग्राहकांना 2,507 रुपयांऐवजी 2,373 रुपये मोजावे लागतील.
यापूर्वी, गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत अनेक वेळा वाढ झाली होती. मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 2,012 रुपये होती. 1 एप्रिल रोजी त्याची किंमत 2,253 रुपये करण्यात आली. त्यानंतर 1 मे रोजी त्याची किंमत 102 रुपयांनी वाढवण्यात आली. यानंतर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,354 रुपये झाली आहे.
मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र मे महिन्यातच त्याची किंमत दोनदा वाढवण्यात आली आहे. 7 मे रोजी कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवली होती. त्यानंतर 19 मे रोजी 3.50 रुपयांच्या वाढीसह अनेक शहरांमध्ये त्याची किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेली. यानंतर दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1,003 रुपयांवर पोहोचली होती.