HDFC Bank: रिझर्व्ह बँकेचा एचडीएफसी बँकेला दंडुका; पाहा किती कोटींचा दंड ठोठावला

काम-धंदा
Updated Jun 19, 2019 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

HDFC Bank: खासगी बँकांमधील आघाडीच्या एचडीएफसी बँकेला नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीच्या प्रकरणांची वेळीच माहिती न दिल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने एक कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे.

HDFC bank file photo
एचडीएफसी बँकेला रिझर्व्ह बँकेचा दंड  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : खासगी बँकांमध्ये आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला रिझर्व्ह बँकेने दणका दिला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच बँकिंग क्षेत्रातील फसवणुकीच्या प्रकरणांची वेळीच माहिती न दिल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे. विशेष म्हणजे, फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या यादीमध्ये जगभरातील पहिल्या दोन हजार कांपन्यांमध्ये भारतातील ५७ कंपन्यांना स्थान मिळाले आहे. त्यातील नामवंत कंपन्यांच्या बरोबरीने एचडीएफसी बँकेचाही समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर काही दिवसात एचडीएफसी बँकेवर एक कोटी रुपयांचा दंड भरण्याची नामुष्की ओढवली आहे. याची दखल एचडीएफसी बँकेने घेतली असून, भविष्यात अंतर्गत सुरक्षेशी संबंधित कोणतीही घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नियमांचे केले उल्लंघन

देशात आयात करणाऱ्या काही व्यापाऱ्यांची एचडीएफसी बँकेत खाती आहेत. त्यांनी विदेशी मुद्रेमध्ये पैसे जमा करताना काही बनावट बिले जमा केल्याची तक्रार होती. याची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसीला दंड ठोठावला आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या टीमने विशेष चौकशी केली आहे. चौकशीत एचडीएफसी बँकेकडून ग्राहकांची माहिती देण्यात तसेच आर्थिक गैरव्यवहार किंवा फसवणुकीसंदर्भातील माहिती देण्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेनं आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केलं आहे.

अनेक बँकांवर कारवाई  

या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी बँकेला नोटीस बजावली होती. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी तुम्हाला आर्थिक दंड का लागू करू नये?, असे नोटीसमध्ये विचारण्यात आले होते. त्यानंतर एचडीएफसी बँकेकडून रिझर्व्ह बँकेला नोटीसचे उत्तर देण्यात आली. त्यावर विचार केल्यानंतर अखेर रिझर्व्ह बँकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईवर एचडीएफसी बँकेने म्हटले आहे की, आम्ही आमच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल करून घेत आहोत. जेणेकरून भविष्यात अशी तक्रार पुन्हा उद्भवणार नाही. या संदर्भात रिझर्व्ह बँक अतिशय कडक नियमावली राबवत असून, एचडीएफसीपूर्वी अनेक बँकांना अशा प्रकारे दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.

दरम्यान, फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या यादीमध्ये जगभरातील पहिल्या दोन हजार कांपन्यांमध्ये भारतातील ५७ कंपन्यांना स्थान मिळाले आहे. त्यात एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे. जगातील चांगल्या कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी बँक २०९ क्रमांकावर आहे तर, एचडीएफसी लिमिटेड ३३२ क्रमांकावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी