ब्रॉडबॅंड इंटरनेटच्या क्षेत्रात महायुद्ध! मुकेश अंबानी-सुनील मित्तल यांना टक्कर देण्यासाठी मस्क-बेझॉस सज्ज

Satellite Based Broadband Internet: इलॉन मस्क यांची उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी स्टारलिंक आणि जेफ बेझॉस यांची कंपनी भारताच्या दूरसंचार विभाग आणि अवकाश विभागाशी स्वतंत्रपणे बोलणी करत आहेत.

Satellite Based Broadband Internet
उपग्रहावर आधारित ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा 
थोडं पण कामाचं
  • दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट यांचे प्रचंड महत्त्व
  • उपग्रहाद्वारे हाय स्पीड ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा पुरवण्याच्या क्षेत्रात मोठी स्पर्धा
  • भारतातील बाजारपेठ काबीज करण्यासाठी इलॉन मस्क आणि जेफ बेझॉस यांच्या योजना

नवी दिल्ली: Satellite Based Broadband Internet: दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट या बाबी मागील काही वर्षात अत्यंत महत्त्वाच्या झाल्या आहेत. अनेक उद्योगधंदे या क्षेत्रांमुळे जोडले गेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रांवर पकड असणाऱ्या कंपन्या किंवा उद्योगपतींचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहे. भारतात रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेल (Airtel) या दोन कंपन्या दूरसंचार सेवा, इंटरनेट सेवा पुरवण्यात आघाडीवर आहेत. आता मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल यांना टक्कर देण्यासाठी इलॉन मस्क आणि जेफ बेझॉस सज्ज झाले आहेत. हे जगातील दोन सर्वात उद्योगपती आता भारतात सॅटेलाईटवर आधारित हाय स्पीड ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा पुरवण्याच्या प्रयत्नात आहेत. इलॉन मस्क (Elon Musk) यांची उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी स्टारलिंक आणि जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांची कंपनी भारताच्या दूरसंचार विभाग आणि अवकाश विभागाशी स्वतंत्रपणे बोलणी करत आहेत. या दोन्ही कंपन्यांना भारतात उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी परवानगी हवी आहे. (Satellite Based Broadband Internet: Elon Musk & Jeff Bezos ready to compete with Mukesh Ambani-Sunil Mittal)

उपग्रह आधारित ब्रॉडबॅंड इंटरसेवा पुरवणार मस्क-बेझॉस

समोर आलेल्या माहितीनुसार इलॉन मस्क आणि जेफ बेझॉस यांच्या कंपन्यांनी उपग्रहावर आधारित ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारताच्या दूरसंचार विभागाशी संपर्क केला आहे. या दोन्ही कंपन्या लवकरच त्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. सध्या सुनील मित्तल यांची भारती एअरटेलदेखील आधीच भारतात उपग्रहावर आधारित इंटरसेवा आणण्याच्या प्रयत्नात आहे. भारती एअरटेलच्या भारती ग्लोबल या कंपनीचा इंग्लंडमध्ये वनवेबमध्ये सर्वात मोठा हिस्सा आहे. भारती एअरटेलकडे दूरसंचार विभागाचे एनएलडी लायसन्स आधीच आहे आणि इतर देशांमध्येदेखील अशी सेवा सुरू करण्यासाठी भारती एअरटेल प्रयत्नशील आहे.

ग्रामीण भाग, वाळवंट आणि डोंगराळ भागांना होणार फायदा

उपग्रहावर आधारित ब्रॉडबॅंड सेवांमुळे ग्रामीण भाग, वाळवंटी प्रदेश, डोंगराळ भाग, दुर्गम भाग इत्यादी ठिकाणांना मोठा फायदा होणार आहे. पारंपारिक ब्रॉडबॅंड सुविधा आणि दूरसंचार सुविधा या भागांमध्ये पोचत नाहीत किंवा सक्षमपणे उपलब्ध नसतात. मात्र उपग्रहावर आधारित ब्रॉडबॅंड सेवांचा लाभ या भागांना होऊ शकेल. दूरसंचार विभागाने म्हटले आहे की उपग्रहावर आधारित ब्रॉडबॅंड सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना दूरसंचार कंपन्यांसाठी असलेल्या नियमांचे आणि सूचनांचेच पालन करावे लागणार आहे. त्यांना सुरक्षेशी निगडीत प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे, त्याचबरोबर सरकारच्या सूचनांचेही पालन करावे लागणार आहे.

मस्कच्या कंपनीची जबाबदारी संजय भार्गवकडे

इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या कंपनीने संजय भार्गव यांची नियुक्ती केली आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरद्वारे भारतातील ब्रॉडबॅंडच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा आपला इरादा आधीच स्पष्ट केला आहे. सध्या इलॉन मस्क भारताच्या नियामक प्रक्रियेचा अभ्यास करत आहेत. १ ऑक्टोबर २०२१ पासून स्पेसएक्समध्ये स्टारलिंक कंट्री डायरेक्टर इंडियाच्या पदावर संजय भार्गव कार्यरत होणार आहेत. भार्गव यांनी लिंक्डइन पोस्टद्वारे आधीच याची माहिती दिली होती. इलॉन मस्क यांच्याप्रमाणेच जेफ बेझॉस यांची कंपनीदेखील संपूर्ण पृथ्वीवर आपली ब्रॉडबॅंड सेवा पुरवण्यासाठी लो अर्थ ऑर्बिट उपग्रहासंदर्भातील आपल्या प्रोजक्ट कुइपरद्वारे भारतात प्रवेश करू इच्छिते. जेफ बेझॉस यांच्या कंपनीला देखील इंटरनेट सेवा पुरवण्याच्या बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी