FD वरील व्याजदरांमध्ये SBIकडून पुन्हा कपात, जाणून घ्या आता किती मिळणार व्याज

काम-धंदा
Updated May 27, 2020 | 17:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

SBI slashes FD rates: देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनं टर्म डिपॉझिटच्या व्याजदरांमध्ये पुन्हा एकदा कपात केली आहे. एफडी केल्यानंतर आता ग्राहकांना पहिले पेक्षा कमी व्याज मिळेल. जाणून घ्या याबद्दल...

SBI
FD वरील व्याजदरांमध्ये एसबीआयकडून पुन्हा कपात, जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • एसबीआयनं सर्व प्रकारच्या टर्म डिपॉझिटवर ४० बेसिक पॉईंट्सनं केली कपात.
 • एसबीआयनं या महिन्यात दुसऱ्यांदा केली व्याजदरात कपात.
 • २ कोटींहून अधिक डिपॉझिटवर ५० बेसिक पॉईंट्सची कपात

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआयनं या महिन्यात दुसऱ्यांदा आपल्या टर्म डिपॉझिटवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. या सरकारी बँकेनं सर्व काळासाठी म्हणजेच प्रत्येक वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर ४० बेसिक पॉईंट्स (बीपीएस) व्याज दरांमध्ये कपात केलीय. एसबीआयच्या टर्म डिपॉझिट दरांमध्ये झपाट्यानं कपात केल्यामुळे आता व्याज दर ४.४० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. तर मोठ्या रकमेच्या डिपॉझिटवर (२ कोटी रुपयांपेक्षा अधिक) एसबीआयनं व्याजदरांमध्ये ५० बेसिस पॉईंट्सची कपात केलीय. नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच २७ मेपासून लागू झाले आहेत. या बदलांनंतर आता एसबीआय ५ वर्ष ते १० वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर ५.४० टक्के अधिकाधिक व्याज दर देईल. जे व्याज दर पहिले ५.७० टक्के होते. यापूर्वी १२ मे रोजी एसबीआयनं ३ वर्षांसाठी टर्म डिपॉझिटवरील व्याज दरांमध्ये २० बीपीएसपर्यंत कपात केली होती.

एसबीआय ‘वी केअर’ एफडी स्कीम जी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, त्यासाठी अधिक व्याज दर देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्यातही कपात झालीय. आता ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्ष आणि त्याहून अधिक काळासाठी एफडीवर ६.२० टक्के व्याज देईल. यापूर्वी या स्कीमवर ६.५० टक्के व्याज मिळत होतं.

एसबीआयकडून टर्म डिपॉझिटवर दिले जाणारे नवीन व्याजदर खालीलप्रमाणे आहे –

कालावधी                                   व्याज दर

 • ७ दिवस ते ४५ दिवसांपर्यंत                 २.९० टक्के
 • ४६ दिवस ते १७९ दिवसांपर्यंत             ३.९० टक्के
 • १८० दिवस ते २१० दिवसांपर्यंत            ४.४० टक्के
 • २११ दिवस ते १ वर्षांच्या कमी               ४.४० टक्के
 • एक वर्ष ते २ वर्षांपर्यंत                        ५.१० टक्के
 • २ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा कमी काळापर्यंत     ५.१० टक्के
 • ३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा कमी काळापर्यंत     ५.१० टक्के
 • ५ वर्ष ते १० वर्षांपर्यंत                          ५.४० टक्के

ज्येष्ठ नागरिकांना ५-१० वर्षांचा कालावधी सोडून वर उल्लेख केलेल्या दरांवर ५० बेसिक पॉईंट्स अधिक मिळतील, ज्यात त्यांना सामान्य जनतेच्या तुलनेमध्ये ८० बेसिक पॉईंट्स अधिक व्याज मिळेल.

यापूर्वी SBI कडून एमसीएलआरमध्येही कपात करण्यात आली

टर्म डिपॉझिटवरील व्याज दरांमध्ये कपात करण्यापूर्वी मे महिन्याच्या सुरूवातीला एसबीआयनं कर्जावरील व्याजदरांमध्येही कपात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं बेंचमार्क लँडिंग रेटमध्ये ०.१५ अंकांनी कपात केली. त्यामुळं ग्राहकांसाठी होम, ऑटो लोन सर्व स्वस्त होणार आहे. या कपातीनंतर एका वर्षासाठी एमसीएलआर ७.४०% हून ७.२५% पर्यंत कमी झाले आहेत. हे नवीन दर १० मे पासून लागू झाले आहेत. बँकेनं एमसीएलआर सतत १२व्यांदा कमी केले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे ३० वर्षांसाठीच्या २५ लाख रुपयांच्या होम लोन खात्यांवर (एमसीएलआरशी निगडित) ईएमआय जवळपास २५५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी